नांदेड - मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी मेघगर्जनेसह हजेरी लावली. नांदेड, किनवट, धर्माबाद, बिलोलीत हलक्या सरी तर, उमरी, मुदखेड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. दरम्यान, वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये मुदखेड तालुक्यातील मुगट येथील शेतकरी दत्ता ढेपाळे (55) यांचा तर किनवट तालुक्यातील शिवणी येथे शेतकरी गंगाधर अभया येवलवाड (55) यांचा समावेश आहे. तर याबरोबरच धर्माबाद शहरापासून काही अंतरावर असलेल्या बाळापूर शिवारात सायंकाळी पाचच्या सुमारास रमेश सुर्यकार यांच्या शेतातील बैल जोडीवर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.
![farmer](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ned-04-2shetkaryachamrutyu-foto-7204231_07072021210748_0707f_1625672268_182.jpg)
आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्यांसह उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नांदेड शहरात मागील काही दिवसांपासून उन्हाचे चटके वाढल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले. दरम्यान, बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. किनवट, धर्माबाद, बिलोली, लोहा या तालुक्यात शिडकावा झाला असून ढगाळ वातावरण तयार झाले होते. तर, मुदखेड, उमरी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. उर्वरित तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून रात्री उशिरा पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
हेही वाचा - कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू होणार
बैलाला झोपडीकडे आणताना पडली वीज -
मुदखेड तालुक्यातील मुगट येथे दुपारी 2:30 ते 3:30 च्या दरम्यान अचानकपणे जोरदार पाऊस सुरू झाला. त्या पावसाबरोबरच विजेचा तांडव मोठ्या प्रमाणात सुरू होता. त्यामुळे शेतामध्ये दत्ता ढेपाळे व त्यांचा मुलगा हे झोपड्यात होते. बैल चारण्यासाठी त्यांनी सोडले होते. पाऊसातच ते झोपडीच्या बाहेर गेले व बैलाला घेऊन झोपडीकडे येत असतात दत्ता ढेपाळे यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह मुदखेड येथील शासकीय दवाखान्यात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे.
किनवट तालुक्यातील शिवणी येथे 7 रोजी शेतकरी गंगाधर अभया येवलवाड मंगळवारी पाऊस झाल्याने आपल्या शेतात फवारणीचे काम करीत असताना पाच वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. शेतकरी येवलवाड हे दुसर्याच्या शेतात आसरा घेण्यासाठी जात असताना अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.