नांदेड- हदगाव शहरालगत असलेल्या कवठा शिवारात शेतातील रस्त्यावरुन भावकीत हाणामारी झाली. यात एका जणाचा मृत्यू झाला आहे. अशोक बाभळे असे मृत्य व्यक्तीचे नाव आहे.
बंडू पुंजाराम बाभळे व मनोज प्रभाकर बाभळे या दोन कुटुंबात शेतात जाण्याच्या रस्त्यावरुन हाणामारी झाली. या हाणामारीत अशोक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अशोकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रविवारी सकाळी बंडू पुंजाराम बाभळे आपल्या मुलगा अशोकसह शेतात जात होते. दरम्यान, त्यांनी सामाईक बांधावरील काट्याचे फरळ काढायला सुरुवात केली. हे पाहून मनोज, तानाजी, प्रियंका, नितीन, रुक्मीणी बाभळे, यांनी बंडू बाभळे यांना व त्यांचा मुलगा अशोक याला मारहाण सुरू केली. या मारहाणीत अशोक गंभीर जखमी झाला. नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
शेतीच्या वादाबाबत या दोन्ही कुटुंबीयांनी पंधरा दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर हा प्रसंग घडला नसता. या घटनेबाबत गुन्हा दाखल होवून तीन दिवस उलटले तरी अद्यापही आरोपींना अटक करण्यात आली नाही.