नांदेड - धर्माबाद शहरातील रेल्वेगेट क्रमांक दोनच्या परिसरात बनावट वाणी बिडी विकणाऱ्या दोघांना येथील पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले आहे. त्यांच्या जवळील अंदाजित ७० हजार २०० रूपयांची विडी व गाडी क्रमांक (टिएस १६ युबी ४९७९) पकडले असून ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
तेलंगणा राज्यातील कामारेड्डी येथे वाणी विडी तयार होते. या विडीची नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. वाणी विडी कंपनीचे सेल्समेन काही दिवसांपूर्वी धर्माबाद शहरात येऊन शहरातील विविध पानटपरीवाल्यांकडे जाऊन वाणी विडीची विक्री करीत होते. त्यावेळी त्यांना शहरातील काही पानटपरीमध्ये बनावट वाणी विडी आढळून आले. त्यामुळे वाणी विडी कंपनीचे सेल्समेन के. हरीश, व्ही. श्रीनिवास यांच्या लक्षात आले की, वाणी विडीसारखीच बनावट विडी तयार करून बनावट लेबल लावून विडी विक्री होत आहे. त्यामुळे त्यांनी त्या पानटपरी चालकास ती विडी आम्हाला मिळवून द्या, असे सांगितले होते. यावरून संतोष साई कल्लारे, योगेश तारामण उग्गेवाड, किशन येताळेकर यांनी बनावट वाणी विडी आणून वरील सेल्समेनला घेऊन जाण्यासाठी सांगितले. या घटनेची माहिती सेल्समेन यांनी येथील पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांना सांगून तक्रार दिली होती.
यावरून पोलीस निरीक्षक भागवत जायभाये, पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर मोरखंडे, गुप्तचर विभागाचे चंपतराव कदम यांच्यासह पोलिसांनी शनिवारी दुपारी रेल्वेगेट क्रमांक दोनच्या परीसरात सापळा रचून बनावट विडीसह दोघांना रंगेहाथ पकडले. यावेळी एक जण पळून गेला.
जप्त केलेली विडी अंदाजित ७० हजार २०० रूपयांची असल्याचे सांगण्यात आले. सेल्समेन यांच्या तक्रारीवरून संतोष साई कल्लारे, योगेश तारामण उग्गेवाड, किशन येताळेकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत. बनावट विडी ओढल्यामुळे विडी शौकीनाचे आरोग्य धोक्यात आले असून काही जणांना आपला जीव गमवावा लागला असल्याची चर्चा तालुक्यातील विडी शौकीनातून होत आहे.