नांदेड - हळदीची नांदेडमध्ये आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमतमध्ये सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी झालेल्या हळदीच्या बीटमध्ये १० हजार ते १० हजार ५०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
मागील आठवड्यात हळदीला ६ हजार ते ६ हजार ५०० रूपये भाव मिळाला होता. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी हळद विकण्यासाठी थांबविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हळदीच्या भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
त्याचप्रमाणे हरभऱ्याच्या भावातही वाढ झालेली आहे. सुरुवातीस हरभऱ्याला ३ हजार ५०० ते ३ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. शेतकऱ्यांनी हरभऱ्याचे खळे करताच बाजारात हरभरा विक्रीस नेला होता. दरम्यान, आता शेतकऱ्याकडे हरभरा शिल्लक राहिला नाही. त्यामुळे बाजारात हरभऱ्याची आवक थंडावली. परिणामी हरभऱ्याचे भाव कडाडले आहे. शनिवारी हरभऱ्याची ४ हजार २०० ते ४ हजार ३०० रूपये प्रति क्विंटल या दराने खरेदी केली गेली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
नांदेड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. परंतु, बाजारात शेतकऱ्यांना हळदीला म्हणावा तसा भाव मिळत नाही. हळदीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर खर्च केला असून लागवडीपासून ते हळद पॉलिश करून बाजारात नेण्यापर्यत भरपूर पैसे खर्च झाला आहे. परंतु हळदीला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी हळदीचे भाव घसरलेल्या स्थितीत दिसत आहे. हळदीला मनासारखे भाव मिळत नसल्याने बाजारपेठेत हळदीची आवक थंडावली असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हळदीची लागवड केली होती. लागवड केलेल्या हळदीच्या उत्पादनात वाढही झाली आहे. परंतु भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना मनाप्रमाणे भाव मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु गतवर्षीपेक्षा यावर्षी बाजारात हळदीला भाव मिळत नाही, असे सांगण्यात येत आहे.
मागील काही वर्षांपासून शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचे आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. शेतीचा खर्च भरपूर करण्यात येत आहे. त्याचबरोबर उत्पादन वाढीसाठी पिकावर भरपूर खर्च करण्यात येत आहे. परंतु मालाला भाव योग्य प्रकारे मिळत नसल्याने शेतकऱ्यावर आर्थिक फटका बसत आहे.
दरम्यान, नांदेड येथे मनमानीप्रमाणे हळदीचे सौदे केले जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. त्यासंदर्भात नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केला.