नांदेड - जिल्ह्यातील नांदेड-अर्धापूर महामार्गावरील वसमतफाटा महामार्ग सुरक्षा पथकाच्या चौकीच्या परिसरातील चौकात ट्रक-दुचाकीचा अपघात झाला. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी पावने दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
हेही वाचा- शबरीमला प्रकरणी पुनर्याचिका आता संविधानिक पीठाकडे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
नांदेडकडून ट्रक अर्धापूकडे (के ए ३३ ए ७९५४) येत होता. हा ट्रक वसमतफाटा चौकातून अर्धापूर वळण रस्त्यावरून हिंगोलीकडे वळण घेत असताना अर्धापूरकडून नांदेडकडे येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिली. रुखमाजी रामजी गव्हाणे (वय-४३) व गणेश गोविंद गव्हाणे (वय-४२) हे त्या दुचाकीवरून प्रवास करत होते. यात रुखमाजी रामजी गव्हाणे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गणेश गोविंद गव्हाणे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पोलीस उपनिरिक्षक आर. आर रहेमान, ईश्वर राठोड, दिपक जाधव, राजकुमार व्यवहारे यांनी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
वसमत फाटा महामार्ग सुरक्षा पथकाच्या चौकीजवळ गेल्या चार वर्षांपासून एका गुन्हातील ट्रक उभा आहे. या ट्रकमुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. हा ट्रक तातडीने हलवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.