नांदेड - किनवट येथे पन्नास हजार रुपयांची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱयांना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई किनवट येथे १४ जूनला करण्यात आली. तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी ही लाच मागितली होती. पोलीस निरीक्षक दिलीप तिडके व कर्मचारी मधुकर व्यंकटराव पांचाळ, पांडुरंग बोईनवाड असे त्यांचे नाव आहेत. घटनेनंतर पोलीस निरीक्षक फरार झाला आहे.
तक्रारदारावर कारवाई न करण्यासाठी पोलीस कर्मचारी मधुकर व्यंकटराव पांचाळ यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांनी त्यास सहमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले आहे.
तक्रारदाराने १३ जूनला पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय नांदेड येथे तक्रार दिली. माझ्यावर कारवाई न करण्यासाठी पोलीस निरीक्षक दिलीप तिडके व पोलीस कर्मचारी पांचाळ हे पन्नास हजार रुपये मागत आहेत, असे नमूद केले. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १४ जून ला रात्री आठ वाजता राजेंद्रनगर येथे तक्रारदाराच्या घराच्या परिसरात सापळा लावला. तेव्हा पांचाळ यांनी ५० हजार रुपये लाच स्वीकारुन पोलीस कर्मचारी पांडुरंग बोईनवाड यांच्याकडे सुपूर्त केली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी मधुकर पांचाळ, पोलीस निरीक्षक दिलीप तिडके, पांडुरंग बोईनवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पोलीस अधीक्षक संजय लाठकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उप अधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी. एल. पेडगावकर, एकनाथ गंगातीर्थ, गणेश तालकोकुलवार, अंकुश गाडेकर, अनिल कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक पेडगावकर करत आहेत.