नांदेड - नांदेडमध्ये आणखी नव्या तीन रुग्णांची नोंद झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासह शहरातील कोरोना रुग्णांची संख्या सहा झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
शहरातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण पीर बुर्हाण नगर येथे आढळला होता. त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, त्याला अन्य आजार असल्याने त्यावर उपचार सुरू होते. अन्य आजारावरील उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सेलू येथून नांदेड येथे उपचारासाठी आलेल्या पॉझिटिव महिलेचा गुरुवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असताना रात्री उशिरा नांदेडमध्ये तीन कोरोनाबाधित आढळून आले. यात सांगवी, कंधार तालुक्यातील एक आणि आखाडा बाळापूरहून उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यास जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी दुजोरा दिला आहे. नागरीकांनी घाबरून न जाता आपआपल्या घरात राहून सुरक्षित राहावे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.