नांदेड - जिल्ह्यातील हदगाव येथील सुप्रसिद्ध किराणा दुकानाचे व्यापारी प्रविण वल्लमसेठवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हदगाव शहरात प्रविण उर्फ नितीन वल्लमसेठवार यांचे प्रशांत ट्रेडींग कंपनी या नावाने किराणाचे होलसेल दुकान आहे. त्यांचे दुकान गेल्या पाच ते सहा दिवसापासून बंद असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. बुधवारी व गुरुवारी वेगवेगळ्या परिसरात वल्लमसेठवार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यात इस्लामपूर परिसरातील पैनगंगा नदीत प्रविण भगवान वल्लमसेठवार (वय-42) यांचा मृतदेह सापडला. तर त्यांची पत्नी अश्विनी यांचा मृतदेह विदर्भातील दराटी (ता.उमरखेड) येथे सापडला. मुलगा सिद्धेश (वय-12) याचा मृतदेह बिटरगाव (ता.उमरखेड) येथे आढळला आहे. सदरील मृतदेहांची ओळख पटली असून त्यांच्या सेजल (वय-२०) व समीक्षा (वय-१३) या दोघी अद्याप बेपत्ता आहेत. वल्लमसेठवार कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूचे कारण सध्या स्पष्ट झाले नाही. त्यामुळे आत्महत्या, घात की अपघात? याचा तपास करण्याचे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे.