नांदेड - हडको येथील आपल्या मैत्रिणीला घेवून नांदेड शहरात येत असलेल्या दुचाकीस्वाराला अडवून तलवारीने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांच्याजवळील 40 हजार रुपयांची सोन्याची पोत आणि सोन्याची अंगठी काढून घेण्यात आली. ही घटना हस्सापूर ते मामा चौक रस्त्यावर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
हडको एन.डी. 31 मधील विनोद कल्याणकराव होळकर रात्री 9 च्या सुमारास आपल्या दुचाकीवर मैत्रिणीला घेऊन निघाला होता. हस्सापर ते मामा चौक रस्त्याने जात असताना पुलाजवळ एका दुचाकीवर थांबलेल्या दोघांनी त्यांना अडविले. तलवारीने त्यांच्यावर हल्ला करत मैत्रिणीच्या गळ्यातील 40 हजार रुपयांची पोत आणि सहा ग्रॅमची अंगठी काढून घेतली. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
हेही वाचा - नांदेडमध्ये टायर फुटून कार पलटल्याने एक जण ठार तर एक गंभीर जखमी
जखमी अवस्थेत होळकर यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले, याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र सांगळे आपल्या पथकासह या आरोपीचा शोध घेत होते.
हेही वाचा - जिल्हा परिषदेत चारही सभापती काँग्रेसचेच; राष्ट्रवादीच्या हाती भोपळा....!