नांदेड - शहरात दुचाकी चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तपास तर दूरच साधा गुन्हा नोंद करण्यास तक्रारदाराला दीड-दोन महिने ताटकळत ठेवले जात आहे. नऊ मे रोजी सेंटर पॉईंट परिसरातून वाहन चोरी करताना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला होता. हे फुटेज मिळूनही वाहन चोरांचा माग काढण्यात पोलीस यंत्रणेला यश आले नाही. यामुळे दुचाकी चोरांनी धुमाकूळ घालता आहे. पोलिसांच्या ही बेफिक्री चोरट्यांचे मनोबल उंचावण्यास कारणीभूत ठरत आहे.
एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असलेले राजू विनायकराव शेटे (रा. जयप्रकाशनगर असर्जन, नांदेड) रुग्णालयात नियमित तपासणी करण्यासाठी ९ मे रोजी दुपारी शिवाजीनगर भागात आले होते. त्यांच्या मालकीची दुचाकी (क्र. एमएच २६ ए.यु. ०४०५) सिटी सेंटरसमोर लावून ते रूग्णालयात गेले. तपासणी झाल्यावर दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास परत आले असता त्यांची दुचाकी पार्किंग केलेल्या ठिकाणी आढळून आली नाही. शोधाशोध करुनही वाहन सापडले नाही. वाहन चोरीचा संशय आल्याने शेटे यांनी परिसरातील व्यावसायिकांना सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली. त्यांची दुचाकी चोरुन नेताना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाल्याचे दिसून आले.
याबाबात त्यांनी शिवाजीनगर पोलिसांना माहिती देवून पाचारण केले. हे प्रकरण चौकशीवर प्रलंबित ठेवले. आज ना उद्या वाहनाचा शोध लागेल या अपेक्षेने दीड महिन्यांपेक्षा अधिक काळ शेटे यांनी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवले.परंतु चोरी झालेली दुचाकी वा चोरांचा शोध काही यंत्रणेला लागला नाही. अखेर कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी तब्बल दोन महिन्यांनी शिवाजीनगर पोलिसांनी शेटे यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि.च्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला.
तपास जोरदार रामकिशन मोरे हे करत आहेत. चोरी झालेल्या दुचाकीच्या डिक्कीत वाहनाचे कागदपत्र, बँकेचे पासबुक, पॅन कार्ड, आधार कार्ड आदी महत्वपूर्ण कागदपत्रे आहेत. शहरातून वाहन चोरी करायचे आणि सीमावर्ती भागात नेवून त्याची विल्हेवाट लावायची असा काहीसा प्रकार चोरटे करत असल्याची चर्चा नागरिकांत पहायला मिळाली.
हैदराबाद येथून सीटीबस चोरुन तिची विल्हेवाट लावताना नांदेड तालुक्यात पोलिसांनी पकडले होते. या प्रकरणातील सात चोरट्यांपैकी तिघे देगलूर नाका व धनेगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेनंतरही शहर परिसरात अनेक दुचाकी, चारचाकी चोरी झाल्या आहेत. परंतु चोरट्यांचा माग काढण्यात यंत्रणा अपयशी ठरत आहे. गुन्हेगारी घटनांवर अंकुश लावण्याऐवजी नको त्या कामात स्वतःला व्यस्त करुन घेण्यास अधिकारी, कर्मचारी रस दाखवत आहेत. परिणामी चोरटे फावत असून नागरिकांच्या मालमत्ता दिवसाढवळ्या चोरी होत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेवून वाहन चोरीला लगाम घालावा, अशी मागणी शहरातून होत आहे.