नांदेड - कंधार शहरात गेल्या 2 महिन्यांपासून भुरटे चोर सक्रिय झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंधार शहर 22 मार्चपासून कडकडीत बंद आहे. याचाच फायदा घेऊन भुरट्या चोरांनी मध्यरात्री बसस्थानका शेजारी असलेल्या हॉटेल इंद्रप्रस्थ बारचे कुलूप तोडून 1 लाख 17 हजाराची विदेशी दारू लंपास केली आहे.
शहरातील भवानीनगरमध्ये असलेल्या हॉटेल इंद्रप्रस्थ बार अँड रेस्टॉरन्टचे कुलूप तोडून काऊंटर व गोडाऊनमध्ये असलेली विदेशी दारू चोरट्यांनी लंपास केली आहे. २१ मार्च रोजी रात्री ११ वाजता कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्वच बार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले. या आदेशाला २० दिवस उलटले असून गुरुवारी मध्यरात्री हॉटेल इंद्रप्रस्थ बार अँड रेस्टॉरंटचे सिल तोडून १ लाख १७ हजार रूपयांची विदेशी दारू चोरून नेल्याची घटना घडली.
सदर घटनेची माहिती राजु सोनकांबळे यांना कळताच त्यांनी दारूबंदी विभागाचे निरीक्षक सुभाष खंडेराय, कॉ.गणेश रेणके, आबास पटेल यांना फोनवरून संबधित माहिती दिली. दारूबंदी विभागाने घटनास्थळी भेट दिली. सदरील बारचे कुलूप तोडून १ लाख ७० हजाराची विदेशी दारू चोरून नेल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.