नांदेड - मराठा-ओबीसी दलित राजकारण करुन देश विभाजनमुख्यमंत्री करण्याचा डाव भाजपने आखला आहे. आगामी काळामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा काँग्रेस पक्षाचा होईल, असा ठाम विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाच्यावतीने स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त नांदेड येथील कुसुम सभागृहात 'व्यर्थ न हो बलिदान-चलो बचाए संविधान' या कार्यक्रमानिमित्त स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पटोले बोलत होते.
जनआशिर्वाद यात्रेला आशिर्वाद मिळणार नाही
राज्यात आगामी काळात काँग्रेस पक्षाचाच मुख्यमंत्री होणार असून, यात कोणतेही दुमत नसल्याचे पटोले यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, भाजपावर टीका करताना ते म्हणाले की, भाजपाची गोडसे संस्कृती धर्माच्या नावावर जाती-जातीमध्ये भांडणे लावून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. देशात महागाईचा भडका उडाला असताना त्यांचे मंत्री जनआशिर्वाद यात्रा काढत आहेत. मात्र, त्यांना कुणीही आशिर्वाद देणार नाही असा टोलाही पटोले यांनी लगावला आहे.
यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास राज्याचे प्रभारी एच.के. पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ना. अमित देशमुख, ना. विजय वडेट्टीवार, ना. वर्षा गायकवाड, ना. अस्लम शेख, पक्षाचे सचिव संपतकुमार, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, शिवाजीराव मोघे, विनायक देशमुख, अभय छाजेड यांच्यासह शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांची उपस्थिती होती.