नांदेड - दलित वस्तीच्या प्राधान्यक्रम यादीवरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी गदारोळ केला. परिषदेच्या सदस्यांनी दलितस्तीचे आराखडे तयार का केले नाहीत, यावरुन गटविकास अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती.
यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी घेण्यात आली. प्रारंभी शोकसभा आणि अभिनंदनाचे ठराव पारित झाला. त्यानंतर मात्र सदस्य संजय बेळगे आणि साहेबराव धनगे यांनी दलितवस्तीचे आराखडे का तयार केले नाहीत, यावर गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले की, सहा महिन्यांपासून हा प्रश्न रखडला आहे. आराखडे तयार झाले असले, तरी आठ तालुक्यांची प्राधान्यक्रम यादी बाकी आहे. यावर संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी माणिक लोहगावे, प्रकाश देशमुख भोसीकर, मंगाराणी अंबुलगेकर आदी सदस्यांनी केली.
सदस्यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी पाच ऑगस्टपर्यंत सर्व गटविकास अधिकाऱ्यांची प्राधान्यक्रम यादी तयार करावी, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी तंबी दिली. त्याचप्रमाणे दक्षिण विभागाच्या विद्युतीकरणासाठीचा साडेतीन कोटी रुपयांचा निधी खर्च न झाल्याबद्दल चंद्रसेन पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला. उत्तर विभागाने निधी वाटप केला. मात्र, दक्षिण विभागाने तो तसाच ठेवला. त्यामुळे यावर अनेक सदस्य आक्रमक झाले होते. काँग्रेसचे सदस्य साहेबराव धनगे यांनी कै. डॉ.शंकरराव चव्हाण यांची जन्मशताब्दी राज्य शासनाने साजरी करावी, याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने पाठवावा, अशी मागणी केली. यावर राज्य शासनाने त्याबाबतची तरतुद केली असल्याची माहिती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी सभागृहात दिली.
जिल्हा परिषदेच्या परिसरात कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांचा पुतळा उभारावा, त्यांच्या नावाने संपूर्ण जिल्ह्यातील जि.प. शाळेमध्ये निबंध स्पर्धा घेण्यात यावी, त्याचप्रमाणे जि.प.शाळा आणि प्रा.आ.केंद्रामध्ये कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांचा फोटो लावण्यात यावा, अशी मागणीही संजय बेळगे यांनी केली. सर्वसाधारण सभेत शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, बांधकाम, कृषी व पशु संवर्धन आदींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.