नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील शिक्षकेत्तर सर्व संघटनेचे कर्मचारी आणि अधिकारी फोरमचे सर्व अधिकारी यांच्या वतीने आज एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता. विद्यापीठ मुख्यालयासह उपकेंद्र लातूर, परभणी आणि हिंगोली येथील न्यू मॉडेल डिग्री कॉलेजमधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या लाक्षणिक संपामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे विद्यापीठातील सर्व कामकाज आज पूर्णपणे बंद होते.
तसेच विद्यापीठातील एकही विभाग आज सुरू करण्यात आला नाही. सातवा वेतन आयोग आणि इतर काही मागण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वच 14 अकृषी विद्यापीठामध्ये हा लाक्षणिक संप सुरू होता. सर्वच विद्यापीठामध्ये कडकडीत बंद पाळून हा लाक्षणिक संप यशस्वी करण्यात आला. तर यावेळी अधिकाऱ्यांनी महासंघाच्या निर्देशानुसार जुलै महिन्यात कोणत्याही प्रसंगी बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा दिला.
विद्यापीठातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 3 जून पासून आंदोलन सुरु केले आहे. आत्तापर्यंत आंदोलनाचे 5 टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. सहाव्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठामध्ये 29 जून रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप करण्यात आला.
यावेळी अधिकारी फोरमचे अध्यक्ष डॉ. अशोक कदम, कर्मचारी संघाचे अध्यक्ष शिवराम लुटे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष उद्धव हंबर्डे, बहुजन कर्मचारी संघाचे अध्यक्ष काळबा हनवते, विद्यापीठ फंड कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष तुकाराम हंबर्डे, विद्यापीठ अधिकारी, कर्मचारी संघ, कर्मचारी संघटना, बहुजन कर्मचारी संघ आणि विद्यापीठ फंड कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.