नांदेड - जिल्ह्यासह देशभरात सुप्रसिध्द असलेल्या सचखंड गुरुद्वारा येथे तख्त स्नान हा धार्मिक सोहळा भाविकांचे आकर्षण बनले आहे. त्याअनुषंगाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही तख्त स्नान सोहळा उत्साहात पार पडला. यासाठी शिख बांधवांनी प्रचंड गर्दी केली.
तख्त स्नानाला असते विशेष महत्त्व -
शिख धर्माचे दहावे गुरू श्री गुरूगोविंदसिंह महाराज यांचे सन 1708 मध्ये येथे अनेक दिवस वास्तव होते. परलोकगमन करण्यापूर्वी त्यांनी श्री गुरूग्रंथ साहिबांना अटल गुरू म्हणून श्री आदी गुरूग्रंथ साहिबांना गुरूगद्दी प्रदान केली. त्यामुळे या स्थानाला तख्त म्हणून थार्मिक मान्यता मिळाली.
दरवर्षी, दिवाळी सणात तख्त स्नान उत्साहात पार पडते. गोदावरीचे पवित्र जल घागरीत भरून अरदास (प्रार्थना) करून जलापासून श्री अंगीठा साहिबांना स्नान घालण्यात येते. या सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहात भाविक एकत्र येत असतात. त्यानुसार आज सचखंड गुरुद्वारा परिसरात तख्त स्नानाप्रसंगी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले.
गुरुद्वाराचे मानकरी व भाविकांनी घातला अभिषेक -
सचखंड गुरुद्वाराला दही, दूध आणि गोदावरी नदीतील पवित्र पाण्याने गुरुद्वाराला अभिषेक घालून आज पारंपरिक "तख्त स्नान" घालण्यात आले. गुरुद्वाराचे मानकरी "घागरीयासिंग" यांनी गोदावरी नदीचे पाणी आणून गुरुद्वाराला अभिषेक घातला. त्यांच्यासोबत हजारो शीखधर्मियांनी गोदावरीवर जाऊन पाणी आणून पवित्र वास्तू गुरुद्वाराची साफसफाई केली. तख्त स्नान सोहळ्यासाठी शीख धर्मातील भाविक कुटुंबासहित सहभागी झाले होते.
हजारो लिटर दूध, दही, पावडर याच्या साहय्याने गुरुद्वारा परिसर धुऊन स्वच्छ करण्यात आला. तसेच ऐतिहासिक शस्त्रे आणि अन्य दुर्मीळ चीजवस्तूंनाही साफ करण्यात आले. हे तख्तस्नान दरवर्षी दिवाळीच्या याच दिवशी घालण्यात येते.