नांदेड - शेणी (ता.अर्धापूर) येथील एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री व पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांनी माझ्या आत्महत्येची दखल घ्यावी अशी चिठ्ठी लिहीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना २१ नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास रोजी घडली.
बँक ऑफ इंडियाचे होते पीककर्ज
अर्धापूर तालुक्यातील शेणी येथील सुरेश बाबाराव धुमाळ (वय ५२) यांच्यावर बँक ऑफ इंडियाचे जवळपास पाच लाखांचे कर्ज व इतरही कर्ज होते. तसेच, या वर्षी अतिवृष्टीमुळे नापिकी झाली. तसेच, सहा महिन्यांपूर्वी काही कारणाने त्यांची ऐंशी हजारांची म्हैसही दगावली होती. तिचा पंचनामा झाला. पण कुठलीही मदत मिळाली नाही.
हेही वाचा - अमरावतीत कोरोना चाचणीसाठी शिक्षकांच्या रांगा; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
मृत्यूपूर्वी राजकीय पदाधिकारी यांच्या नावे लिहिली चिठ्ठी
कर्ज व दैनंदिन आर्थिक अडचण या विवंचनेत २१ नोव्हेंबरला मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांच्या नावाचा उल्लेख करत माझ्या आत्महत्येची दखल घ्यावी, अशी मागणी करत शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून अर्धापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'त्यांनी' तर दहशतवाद्यांना पाठिंबा दिला... 'लव्ह जिहाद' प्रकरणात किरीट सोमैयांची उडी