नांदेड - कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे लग्नांवर होणारा अनाठायी खर्च मात्र टळत आहे. अत्यंत कमी नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह पार पडत असून हीच परंपरा कायम राहिली तर शेतकरी बापासाठी खूप चांगले राहील, अशी भावना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुलगी संपदा उर्फ काशी कदम हिने व्यक्त केली.
अर्धापूर तालुक्याच्या कोंढा येथील शेतकरी केशव कदम यांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यांची मुलगी संपदा उर्फ काशीबाई हिचा विवाह शेलगाव (ता. अर्धापूर) येथील संदीप उत्तमराव राजेगोरे यांच्याशी अर्धापूर शहरातील अक्षरांगण शाळेत पार पडला.
लग्नावरील अनाठायी खर्च टाळण्यासाठी मी लॉकडाऊनमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांनीही अनाठायी खर्च टाळून साध्या पद्धतीने विवाह करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि ही परंपरा कायम ठेवावी, अशी भावना यावेळी संपदाने व्यक्त केली.
शासनाच्या सर्व नियमांप्रमाणे सूचनेचे पालन करून हा विवाह पार पडला. उपस्थित प्रत्येक नातेवाईक आणि पाहुण्यांनी सॅनिटायझर, मास्कचा वापर करत सुरक्षित अंतराचे पालन केले. पुणे येथील भोई फाउंडेशन व अर्धापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुण्यजागर प्रकल्पांतर्गत अर्धापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाना दत्तक घेतले आहे. सर्व शैक्षणिक खर्च त्यांच्याकडून करण्यात येतो. त्याच पुण्यजागर प्रकल्पातील संपदा हिचा विवाह येथील अॅड. किशोर देशमुख यांच्या पुढाकारातून अक्षरांगण शाळेत पार पडला.
अनावश्यक खर्च टाळून शेतकऱ्यानी काटकसरी होणं गरजेचं - अॅड. देशमुख
गत २०१५मध्ये कर्ज व नापिकीमुळे कोंढा येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. आज त्यांच्याच मुलीचे लग्न आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे आम्ही साध्या पद्धतीने हे लग्न पार पाडले. लग्नाच्या माध्यमातून होणारा अनावश्यक खर्च टाळावा. शेतकऱ्यांनी वेळीच काटकसरी होणे आवश्यक असून कोणत्याही शेतकऱ्यावर केशव कदम सारखी वेळ येऊ नये, हा संदेश घेण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली.