नांदेड - जिल्ह्यातील लोहा शहरातील जुन्या गावात राहणार्या अहेमद शेख कुरेशी यांच्या घरी गुरुवारी गॅसवर चहा करत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोटाने घरावरील टिनपत्रे जळाली. तर घरातील संसार उपयोगी सर्वच वस्तू जळून खाक झाल्या. यात जीवितहानी झाली नसून घरातील महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत.
गॅसच्या टाकीचा अचानक स्फोट -
मोलमजूरी करुन अहेमद शेख कुरैशी उर्फ बडेसाब कुटुंबाचा गाडा ओढतात. नेहमीप्रमाणे कामाला जाण्याच्या घाईत गुरुवारी सकाळी गॅस चालू करुन कुरेशी यांची पत्नी स्वयंपाक करत आसताना अचानक स्वयंपाकघरातील गॅस सिलिंडरने पेट घेतला.
जीवितहानी नाही -
यावेळी त्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला. परंतू, आग वाढत गेली. आगीच्या भीतीने कुरेशी कुटुंब घराबाहेर आले. काही क्षणातच टाकीचा स्फोट होऊन घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. घरावरील टीन पत्रे उडून गेली. यामध्ये प्रसंगवधान राखून बाहेर आल्याने जीवितहानी टळली.
तातडीने मदतीचा हात -
ही बातमी वार्यासारखी शहरात पसरली. अनेकांनी तत्काळ कुटुंबाला गरजेच्या अन्न, वस्त्र, वस्तू खरेदी करुन मदतीचा हात दिला. प्रशासनाने पंचनामा करुन कुटुंबाला न्याय देण्याचे आश्वासन दिले. या घटनेची माहिती मिळताच कंधार उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर, तहसीलदार विठ्ठल परळीकर, पोलीस निरीक्षक संतोष तांबे यासह अनेकांनी मदतीचा हात पुढे केला.
हेही वाचा - आम्ही मृत्यूचे कोणतेही आकडे लपवले नाही; सरकार पारदर्शकपणे काम करते आहे - राजेश टोपे