नांदेड - आजच्या दिवशी आरोप करून दिवसाचे महत्त्व करू नये, हा आजच्या दिवसाचा आपमान ठरेल अशी प्रतिक्रीया उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये दिली. संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच्या वेळेआधी ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा अपमान केला असा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला. यावर फडणवीस यांनी ही प्रतिक्रीया दिली. हैद्राबाद येथे मुक्ती संग्राम दिनाचाच कार्यक्रम ( Liberation Day Program )आहे, तीन राज्याचे मुख्यमंत्री तिथे आहेत. मुख्यमंत्र्यांना लवकर ध्वजारोहन करण्याची काही हौस नाही. आजच्या दिवशी राजकारण करू नये असे फडणवीस म्हणाले. ( Students Agitation For Police Recruitment In Front Of Devendra Fadnavis In Nanded )
नोकर भरतीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा गोंधळ, निवेदन स्वीकारून उपमुख्यमंत्री पुढे रवाना - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत नोकर भरती आणि पोलीस भरतीच्या घोषणा दिल्या. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यासाठी उपमुख्यमंत्री नांदेड मध्ये आले होते. ध्वजारोहणा नंतर फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी गेले होते. ज्या ठिकाणी चित्रप्रदर्शन होते त्या ठिकाणी कोचिंग क्लासेसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. फडणवीस येणार असल्याने मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाले होते. चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन करून फडणवीस बाहेर येत असताना विद्यार्थ्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. नोकर भरती झाली पाहिजे, पोलीस भरती झाली पाहिजे अश्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी फडणवीस जवळ गेले. गोंधळ वाढत असल्याने फडणवीस विद्यार्थ्यांचे निवेदन घेऊन पुढे रवाना झाले. दरम्यान विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.