नांदेड - संपूर्ण मानव जातीला सध्या कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. या संसर्गजन्य विषाणूचा वरचेवर वाढता प्रार्दुभाव लक्षात घेऊन शासनाने लॉकडाऊन वाढवले आहे. त्यातच मे महिन्यात कडक उन्हाळा असल्याने मानवाबरोबर पशु, पक्षी, प्राणी पाण्यासाठी व्याकूळ होताना दिसून येत आहेत. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांनी तहानलेल्या पशु-पक्षांची तहान भागवून त्यांचे संरक्षण करण्याचे संकल्प अभियान चालवत आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र-कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी ‘कोरोना योध्दे' म्हणून समाजात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करत कोरोनाच्या संसर्गजन्य विषाणूबाबत जनजागृती, रक्तदान शिबीराचे आयोजन, मास्कचे वाटप, सॅनिटायझरचे वाटप, अन्नदान वाटप, आरोग्य सेतू ॲपची माहिती देणे, अशा प्रकारे जनजागृती करण्यासाठी उतरले आहेत. यासोबतच तहानलेल्या पशु-पक्षांची तहान भागवून त्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प अभियान राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक चालवत आहेत.
विद्यापीठ परिसरासह आपल्या घराच्या परिसरात असलेल्या झाडांवर पशु-पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत आहेत. यातील काही स्वयंसेवकांनी आपल्या घरातील नारळापासून पाण्यासाठी सकोरे तयार केले. अशा वस्तूंचा उपयोग करून एकही रुपया खर्च न करता ‘टाकावू पासून टिकाऊ' बनवून उपयोगात आणून पशु पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करीत आहेत. असे पाण्याचे सकोरे विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील वृक्षांना लटकविण्यात आले.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. के. विजयकुमार, रासेयो नांदेड जिल्हा समन्वयक प्रा.मारोती लुटे यांची उपस्थिती होती. या अभियानात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक अमोल सरोदे, संदीप कळासरे, व्यंकटेश इंगोले, रेश्मा भारती, निखिल मोरे, सोनिया बहादूरे, किरण सुर्यवंशी, कल्याणी आवचार, श्वेता काहत, श्रद्धा सावंत, रेश्मा शेख यांनी सहभागी होत आपापल्या घराच्या परिसरामध्ये हे अभियान राबविले.
सध्याच्या लॉकडाऊन आपत्कालीन स्थितीत आपण सर्वजण आपल्या घरात सुरक्षित आहात, तेव्हा बाहेर पशु-पक्षी जे की कुठेतरी मनुष्यावर किंवा इतर गोष्टींवर अवलंबून आहेत. त्यामुळे आपणही त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी आणि पर्यावरणाचे संरक्षण करावे, असा संदेश यामाध्यमातून विद्यापीठाच्या रासेयोच्या स्वयंसेवकांनी दिला आहे.