नांदेड : जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी व परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने हातातोंडाशी आलेले सोयाबीन हातचे गेले आहेत. जे थोडेफार उरलेले सोयाबीन शिल्लक आहे, त्या सोयाबीनला मोड फुटले आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत असून, पावसाच्या या लहरीपणामुळे मेटाकुटीस आले आहेत.
कुंडलवाडीसह परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे शासनाकडून कधी होतील, या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरच पेरणी केली. मात्र, बियाणे बोगस निघाल्यामुळे त्यांना दुबार पेरणी करावी लागली. मात्र, अचानक आठवडाभर बरसलेल्या संततधार पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून कुंडलवाडी शहरासह परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
या पावसामुळे कुंडलवाडीमधील नदी-नाले तुडुंब भरले आहेत. मूग, उडीद गेल्याने शेतकऱ्यांची सोयाबीनवर आशा होती. परंतु त्यालाही कोंब फुटल्यामुळे ते चांगलेच धास्तावले आहेत. आता आशा उरली ती केवळ शासनाच्या मदतीची. तेव्हा शासनाने कुंडलवाडी व परिसरातील नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत करून दिलासा द्यावा, अशी मागणी कुंडलवाडी व परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - नांदेडच्या कोरोना विलगीकरण अभियानाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक....!