नांदेड - पंढरपूर विधानसभेच्या पोट निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीत चलबिचल वाढल्याचे दिसून येत आहे. देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर येथे पोट निवडणुकीचे वेध लागले आहेत. मंत्री अशोक चव्हाण यांनी स्वर्गीय अंतापूरकर यांच्या मुलाला पोट निवडणुकीसाठी तयारी करण्यास सांगितल आहे. दुसरीकडे माजी आमदार सुभाष साबणे यांनी प्रसंगी उमेदवारीसाठी भाजपात जायची तयारी ठेवली आहे.
पंढरपूरचा निकाल लागताच काँग्रेस तयारीला -
पंढरपूर पोटनिवडणुकीचा निकाल लागताच काँग्रेसने देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु केली आहे. दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या चिरंजिवास काँग्रेस नेत्यांनी सक्रिय राजकारणात उतरत असल्याने तेथील शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. देगलूर विधानसभेची जागा काँग्रेसची आहे. कोणत्याही परिस्थितीत ती शिवसेनेकडे जाणार नाही, यावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये झालेल्या एका बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे साबणे यांच्या मनातील घालमेल वाढली असून पोटनिवडणुकीतील उमेदवारीसाठी ते भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
काँग्रेसचे अंतापूरकर यांनी साबणे यांचा केला होता पराभव -
देगलूरचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मागील महिन्यात कोरोना संसर्गामुळे निधन झाले. पुढील काळात तेथील विधानसभा सदस्यपदाच्या रिक्त जागेची पोटनिवडणूक अपेक्षित आहे . २०१९च्या विधानसभा निवडणुकीत रावसाहेब अंतापूरकर हे २२ हजार ४३३ मताधिक्याच्या फरकाने विजयी झाले होते. शिवसेनेच्या तिकिटावरील महायुतीचे उमेदवार व तत्कालिन आमदार सुभाष साबणे यांचा त्यांनी पराभव केला होता. त्या निवडणुकीत झालेल्या पावनेदोन लाख मतांच्या ६० टक्के मते अंतापूरकरांना आणि ४९ टक्के मते साबणे यांना मिळाली होती.
आमदार अंतापूरकर यांना युवक काँग्रेसचे पद देऊन केले राजकारणात सक्रिय -
अंतापूरकरांचे चिरंजिव जितेशकुमार यांना काँग्रेसने युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीसपद देऊन यांना नुकतेच सक्रिय राजकारणात उतरविले. राज्याचे बांधकाममंत्री व नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पोटनिवडणुकीच्या पूर्वतयारीचा अनौपचारिक शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे तेथे पोटनिवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे हे अधिक सावध झाले आहेत.
पंढरपूर प्रमाणेच भाजपकडे साबणेच्या माध्यमातून पर्याय?
पंढरपूरमध्ये विजयी झालेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे हे २०१९च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे बंडखोर उमेदवार होते. शिवसेनेला ती जागा सुटली नसल्याने त्यांनी बंडखोरी करुन दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. २०१४मध्ये आवताडे हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते. २०१९च्या निवडणुकीतील भाजप उमेदवार सुधाकर पारिचारक यांचे निधन झाल्याने तेथे भाजपकडे आवताडे यांच्या उमेदवारीचा पर्याय खुला झाला. तसाच पर्याय देगलूरच्या बाबतीत सुभाष साबणे यांच्या वाट्याला येऊ शकतो. पंढरपूरमध्ये दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भगिरथ भालके यांना महाविकास आघाडीने राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली. तेथे त्यांचा अत्यल्प मतांनी पराभव झाला. दोन्ही जागेवरील परिस्थिती वेगळी आहे. २०१९मध्ये देगलूरमध्ये बंडखोरी झाली नाही. विभाजन करणारा दुसरा उमेदवारही उभा नव्हता. त्यामुळे साबणे सोबत नसतील तरी विजयी होऊ, असा आत्मविश्वास बहुधा काँग्रेसकडे असल्यानेच त्यांनी देगलूरची तयारी सुरु केल्याचे मानले जात आहे. पंढरपूरप्रमाणे देगलूरलाही आमदारांचा वारसा त्यांच्या चिरंजिवाकडे देण्यात येणार असल्याने महाविकास आघाडीतदेखील त्यात बदल होण्याची फारशी शक्यता नाही. दोन्हीकडील योगायोग सारखाच असल्याने देगलूरमध्ये महाविकास आघाडीलाही ही निवडणूक कसोटीने लढवावी लागणार आहे. आमदार साबणे यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले तर या निवडणुकीत चांगलीच रस्सीखेच होणार असे जाणकार सांगण्यात येत आहे.
...तर पंढरपूरची पुर्नरवृत्ती, साबणेचा अप्रत्यक्ष इशारा
देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती टाळायची असेल तर आपल्याला शिवसेनेने उमेदवारी द्यावी अशी मागणी साबणे यांनी केली आहे. साबणे हे सेनेचे जुन्या पिढीतील नेते असून दोन वेळा ते विधानसभेवर निवडून गेले होते. गेल्या निवडणुकीत त्यांचा स्वर्गीय अंतापूरकर यांनी पराभव केला होता. मात्र, आता साबणे यांनी उमेदवारीसाठी अप्रत्यक्षपणे सेनेला जय महाराष्ट्र करण्याचा इशारा दिल्याने नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.