नांदेड- बिलोली शहरात खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला वनविभागाच्या पथकाने सापळा रचून पकडले. वनविभागाने याप्रकरणी 7 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे २ खवले मांजर आढळले आहेत. वनविभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बिलोली शहरातील देशमुखनगर येथे ही कारवाई करण्यात आली.
वनविभागाच्या पथकाने मंगळवारी सकाळी छापा टाकून आंतरराज्यीय टोळीतील 7 जणांना दोन जिवंत खवल्या मांजरासह जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. वनपरीक्षेत्र विभाग देगलूर अंतर्गत बिलोली शहरातील देशमुखनगर भागातील तकोदिन खैरोदिन याच्या घरी छापा टाकण्यात आला. वन्यप्राण्यांची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी शहरात असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. या गोपनीय माहितीवरून उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सकाळी वनविभागाच्या पथकाने धाड टाकली.
याप्रकरणी आरोपी रविंद्र संतोष स्वामी रा. परभणी, रतन भिवाजी हानवते रा.खडकी ता. हिमायतनगर, सुनिल साहेबराव वायकोळे रा.वारंगाटाकळी ता. हिमायतनगर, फकिर महेबुब शेख रा.सोनारी ता. हिमायतनगर, तोहितपाशा शेख रा. बिलोली, तकोयोदिन खैरोदिन रा.बिलोली, मुजिबोदिन खैरोदिन खतिब रा. येडकी ता. कळमनुरी यांना ताब्यात घेण्यात आले.