नांदेड - जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव, अर्धापूर, माहूर, किनवट तालुक्यातील अनेक गावात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. यामुळे अनेक नागरिक घराबाहेर येऊन थांबले आहे. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता 3.9 रिष्टर स्केल एवढी आहे.
जिल्ह्यातील माहूर, किनवट तालुक्यातील अनेक गावात मोठा आवाज होऊन भूकंपाचा काही सेकंदाचा सौम्य धक्का जाणवल्याचे नागरिक सांगत आहेत. भूकंप झाल्याच्या भीतीने अनेक गावातील नागरिक घराबाहेर रस्त्यावर येऊन थांबले आहेत.
भूकंपाचे केंद्र हे नांदेडपासून नव्वद किमी अंतरावर ईशान्य भागास आहे. किनवट, माहूरसह जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, हिमायतनगर, हदगाव या परिसरातही सौम्य धक्का जाणवल्याची चर्चा आहे. ९ वाजून १७ मिनिटांनी हा भूकंप झाला असल्याचा अंदाज प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
भूकंपाचे धक्के सौम्य आहेत. अफवांच्या पोस्ट पुढे पाठवू नका. परिस्थितीबाबत प्रशासनाची अधिकृत सूचना येईल. तो पर्यंत सतर्क रहा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील सोशल मीडियावर मात्र भूकंपाच्या बाबतीत प्रचंड अफवा असून जमिनीवर कमी अन व्हाट्सअॅप व फेसबुकवर या चर्चेला ऊत आला आहे.