नांदेड scooter run on petrol and charging : अभियांत्रिकीचं बी टेकचं शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या शोधात असणाऱ्या नांदेडच्या एका तरुणानं पेट्रोल आणि बॅटरीवर चालणारी अनोखी स्कुटी तयार केलीय. विशेष म्हणजे एकाच वेळी पेट्रोल अन् चार्जिंगवर चालणारी ही स्कुटी 15 रुपयांत तब्बल 50 किमी धावणार आहे. या अनोख्या शोधामुळं या तरुणाचं सर्वत्र कौतुक होतंय. अक्षय माधवराव वसुरे असं ही स्कुटी तयार करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी बाइकप्रेमी गर्दी करत आहेत.
एकाच वेळी चार्जिंग आणि पैट्रोलवर चालणारी स्कुटी केली तयार : दिवसेंदिवस वाढणाच्या इंधनाच्या किमती, वाढतं प्रदूषण आणि महागाई या समस्या भेडसावणाऱ्या ठरत आहेत. आजच्या काळात पेट्रोल बाइक वापरणं हे सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेलं असून, अनेक जण इंधन दरवाढीला वैतागून इलेक्ट्रिक बाइक खरेदीकडं वळले आहेत. मात्र, लाखो रुपयांची ई-बाइक अनेकांना खरेदी करणं शक्य नसल्यानं नांदेड शहरातील एका 28 वर्षीय अक्षयनं भन्नाट जुगाड करत चक्क जुन्या वापरत्या स्कूटीवर बॅटरी बसवून कमी खर्चात एकाच वेळी चार्जिंग आणि पेट्रोलवर चालणारी स्कुटी तयार केली आहे.
दोन वर्ष सखोल संशोधन केल्यावर तयार केली स्कुटी : मागच्या तीन वर्षांपूर्वीच अक्षयनं पहिला प्रयोग करत प्रत्यक्ष संशोधन करुन कामाला सुरुवातही केली आणि स्वत:च्या स्कुटीला बॅटरी बसवून ई-स्कुटी तयारही केली. मात्र, त्यावेळी तयार केलेल्या स्कूटीमध्ये चार्जिंगसंदर्भात काही समस्या येऊ लागल्या आणि या प्रयोगासाठी त्याला चार बॅटरी लागत असल्यानं त्यानं तात्पुरता हा प्रयोग थांबविला. त्यानंतर अक्षयनं पुन्हा यासंदर्भात दोन वर्षे सखोल संशोधन केलं. वेगवेगळी माहिती मिळवली आणि पुन्हा मोठ्या जोमानं प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. यात त्यानं पूर्वी केलेल्या प्रयोगापेक्षाही हायटेक तंत्रज्ञान वापरुन जुन्या स्कुटीवर लिथियम बॅटरी बसवून टिकावू आणि दर्जेदार ई- स्कुटी तयार केलीय.
इंधन दरवाढीमुळं पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या परवडत नसल्यानं चार्जिंगवरची स्कुटी तयार करण्याचा संकल्प केला. कमी खर्चात इलेक्ट्रिक स्कुटी तयार करण्यासाठी स्वत:च्याच जुन्या वापरात असलेल्या स्कुटीवर बॅटरी बसविली आणि चार्जिंग प्लस पेट्रोलवर एकदाच चालवता येणारी प्रदूषणमुक्त स्कुटी तयार केली. सध्या मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्कुटी तयार करुन देण्यासाठी मागणी वाढतेय. - अक्षय वसुरे, स्कुटी बनवणारा तरुण
स्कुटी तयार करण्यासाठी 57 हजार खर्च : अक्षय एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं पेट्रोल प्लस चार्जिंग, अशा दोन्ही प्रकारांत चालवता येईल, अशी हटके स्कुटी घरीच तयार केली. जुन्या वापरत्या स्कूटीवर हा प्रयोग यशस्वी झाल्यानं नागरिकांना आता कमी पैशात पेट्रोल आणि चार्जिंगवर एकाच वेळी चालवता येणारी स्कुटी मिळणार आहे. त्यामुळं त्याच्या या वैज्ञानिक कलेचं सर्वत्र कौतुक होतंय. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक स्कुटीची बॅटरी चार तासांत पूर्ण चार्ज होते. पूर्ण चार्ज होण्यासाठी केवळ दीड युनिट वीज लागते. बॅटरी फुल चार्ज झाली की, सुमारे 45 ते 50 किलोमीटर ही स्कुटी धावते. ही स्कुटी तयार करण्यासाठी 57 हजारांवर खर्च आलाय. याशिवाय गाडी धावत असतानादेखील बॅटरी चार्ज होण्याची सुविधा आहे.
हेही वाचा :