नांदेड - 15 ऑगस्टपर्यंत भाऊराव चव्हाण साखर कारखान्याने गेल्या वर्षीची थकीत एफआरपी प्रतिटन 500 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. अन्यथा, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री आणि कारखान्याचे मुख्य प्रवर्तक अशोक चव्हाण यांच्या घरासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन केले जाईल, असा इशारा भोकर मतदार संघातील सरपंचांनी दिला. याविषयीचे निवेदन भाऊराव चव्हाण साखर कारखान्याचे चेअरमन गणपत भाऊ तिडके व्हाईस चेअरमन प्रा. कैलास दाड यांना दिले.
गेल्या वर्षी गाळपाला गेलेल्या उसाचे प्रतिटन 500 रुपये कारखान्याकडे आहेत. अनेक कारखान्यांनी व्यापार पूर्ण केला. परंतु भाऊराव चव्हाण कारखान्यांनी अद्याप त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे गावातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने कर्तव्य भावनेने प्रातिनिधिक स्वरूपात सरपंचांनी या आंदोलनात सहभाग घेतला असून. 14 ऑगस्टपर्यंत भाऊराव कारखान्यांनी गेल्यावर्षीची थकीत बाकी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी कारखाना प्रशासनाकडे केली आहे. अन्यथा, 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिेनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यावर ठाम असल्याचा इशारा कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके व्हाईस चेअरमन प्रा.कैलास दाड यांना दिला.
यावेळी शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले, उपसभापती अशोक कपाटे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष सरपंच भगवान कदम, कोंढा सरपंच राम कदम, बारडचे उपसरपंच बाळासाहेब देशमुख, सरपंच सतीश कदम, सरपंच विजय जाधव, सरपंच संजय सावते, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष कपाटे, कैलास कल्याणकर, गणपत शिंदे, संदीप व्यवहारे, गोविंद कपाटे, नारायणराव कपाटे, शिवाजी कपाटे आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका -प्रल्हाद इंगोले
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी कर्तव्य भावनेतून प्रातिनिधिक स्वरुपात भोकर मतदार संघातील व कारखाना कार्यक्षेत्रातील सरपंच हे गावातील शेतकऱ्यांची व्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर लाक्षणिक आंदोलन करून करणार आहेत. सरकार महा विकास आघाडीचे आहे व कारखाना पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली चालणारा असल्याने त्यांनी सरपंचावर आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये, अशी अपेक्षा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी व्यक्त केली. 15 तारखेचे आंदोलन अटळ असल्याने जिल्हा प्रशासनाने ही या बाबत मध्यस्थी करून तोडगा काढणे अपेक्षित आहे.