नांदेड - जिल्ह्यातील भोकर शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेला कैलासगड (दत्तगड) अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून आजही या गडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. हे अनधिकृत असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देवदत्त दशनाम संन्यासी असोसिएशनने दिला आहे.
भोकर शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कैलास गडावरील तलावात दरवर्षी गणेशाचे विसर्जन करण्यात येते. तिर्थक्षेत्र तसेच पर्यटन स्थळ असलेले कैलासगड सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. यापूर्वी महंत उत्तमबन महाराज यांनी अनेकवेळा मुख्याधिकारी यांना अतिक्रमण संदर्भात निवेदन ही दिली. पण या निवेदनाकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केले. यामुळे आज अतिक्रमण होत आहे. अतिक्रमण करताना मोठ्या प्रमाणात खोदकाम होत असल्याने भविष्यात माळीनसारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अनधिकृत असलेले अतिक्रमण हटविण्यात यावे, अशी मागणी देवदत्त दशनाम संन्यासी असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. हे अतिक्रमण हटविण्याची टाळाटाळ झाली, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
या निवेदनावर कोलंबी संस्थानचे संतश्री १०८ महंत यदुबन गुरू गंभीरबन महाराज, देवदत्त दशनाम संन्यासी असोसिएशनचे अध्यक्ष सुर्यकांत गोस्वामी, उपाध्यक्ष संतश्री अवधुतबन गुरूशंकरबन महाराज, सचिव संतश्री शामगीर गुरू ऋषीगीर गीरी महाराज, संतश्री चैतन्यभारती गुरू महाराज, संतश्री मोतीगीर गुरू महाराज, संतश्री निर्गुणपुरी गुरू महाराज, संतश्री शांतिबन गुरू महाराज, संतश्री उत्तमबन गुरू महाराज यांच्या सह्या आहेत. निवेदन दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी पवन चांडक यांनी सदर अतिक्रमण संदर्भात नगर परिषदेला सूचना देऊन हे अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.