नांदेड - भारताचे माजी गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण आणि कुसूमताई चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केला जाणारा ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सव कोव्हिड-१९ च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी रद्द करण्यात आला आहे. मात्र रसिकांचा हिरमोड होऊ नये म्हणून, ‘संगीत शंकर दरबार’ या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवरून मागील सोळा वर्षांतील निवडक स्मृतींना उजाळा दिला जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन
दरम्यान मागील सोळा वर्षांतील संगीत शंकर दरबार महोत्सवाच्या स्मृतींना उजाळा देणार्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा लाभ अधिकाधिक रसिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण आणि उपाध्यक्षा अमिता चव्हाण यांनी केले आहे. या कार्यक्रमांना 25 फेब्रुवारीपासून फेसबुक पेज आणि युट्यूबर सुरुवात होणार आहे.
‘शंकर साहित्य दरबार’ साहित्य महोत्सवही रद्द
संगीत शंकर दरबारप्रमाणेच गत दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेला ‘शंकर साहित्य दरबार’ साहित्य महोत्सवही रद्द करण्यात आला आहे. रसिकांची सांगितिक आणि बौध्दिक भूक भागविणारे हे दोन्ही महोत्सव कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.