नांदेड - मराठवाड्यातील दुसरा सहकारी साखर कारखाना अशी सहकार क्षेत्रात ओळख असणाऱ्या कलंबर' चे दीर्घकाळ चेअरमन म्हणून आपल्या कार्याचा राजकारणात दबदबा निर्माण करणारे संभाजी रामजी पाटील उमरेकर यांचे दीर्घ आजाराने त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. त्यांचे वय ८० वर्ष होते. लोहा तालुक्यातील उमरा या त्यांच्या गावी संभाजी पाटील यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मराठवाड्यातील ढोकी (उस्मानाबाद) हा पहिला सहकारी साखर कारखाना त्यानंतर राज्याचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पद्मश्री श्यामराव कदम यांनी ज्या कलंबर साखर कारखान्याची पायाभरणी केली. तो सहकार क्षेत्रात दुसरा साखर कारखाना होय. पद्मश्री श्यामराव कदम यांच्यानंतर म्हणजे (१९८२ नंतर १९९८ पर्यंत) दीर्घकाळ संभाजी पाटील उमरेकर यांच्या ताब्यात हा साखर कारखाना होता. देशाचे माजी गृहमंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांचे ते सहकारी होते. बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याशी त्यांचे सौहार्दापूर्ण संबध होते.
संभाजी पाटील यांनी तुप्पा, विष्णुपूरी गटातून दोन वेळा जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून नेतृत्व केले. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन वेळा उपसभापती आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले.
१९८० मध्ये मुदखेड विधानसभा निवडणूक त्यांनी साहेबराव बापू बारडकर यांच्या विरोधात लढवली होती. त्यांच्या पत्नी अनुसायबाई या खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मावस बहीण आहेत. त्याही जि.प.सदस्या होत्या. संभाजी पाटील यांनी अनेक कुटुंब उभे केले. आक्रमक, धाडसी उमरेकर यांच्या काळात कारखाना अव्वल होता.
भाई केशवराव धोंडगे, माजी सभापती व्यंकटराव मुकदम, लोह्याचे पाहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील पवार, माजी सभापती विठ्ठलराव पवार, अॅड.के.एम.पवार असा मोठा गोतावळा होता.
पाटील यांच्या पश्चात शहाजी पाटील उमरेकर, डॉ.सचिन पाटील उमरेकर, लोह्याचे माजी सभापती सतीश पाटील उमरेकर ही तीन मुले, पुतणे, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. गेल्या काही दिवसापासून ते आजारी होेते. मंगळवारी सायंकाळी ४ वाजता दीर्घ आजाराने त्यांचे राहत्या घरी नांदेड येथे निधन झाले. बुधवारी सकाळी ९ वाजता उमरा (ता.लोहा) येथे होणार आहेत. त्यांच्या निधनाने वृत्त कळताच परिसरात शोककळा पसरली.
जिल्ह्याने धाडसी नेतृत्व गमावले - खा.चिखलीकर
संभाजी पाटील उमरेकर हे आक्रमक धाडसी नेतृत्व होते. त्यांनी दीर्घकाळ कलंबर साखर कारखाना चांगल्या प्रकारे चालविला. त्यांचे व आमचे कौटुंबिक नाते होते. मागील काही दिवसांपूर्वीच मी त्यांच्याकडे गेलो प्रकृतीची विचारपूस केली आणि आज ही बातमी कळली. जिल्ह्याने एक धाडसी नेतृत्व गमावले आहे. साखर उद्योगातील त्यांचे कार्य दीर्घकाळ प्रेरणादायी राहणार आहे. उमरेकर परिवाराला या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो. संभाजी पाटील यांच्या आत्म्यास शांती लाभो या शब्दात खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.