नांदेड - परतीच्या पावसाने लाखो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने वाडी पाटी येथे रास्ता रोको करण्यात आले. हे आंदोलन तब्बल तीन तास चालू होते.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडने वाडी पाटी येथे तीन तास रास्ता रोको केले. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देऊन ओल्या दुष्काळाची मागणी केली.
यावेळी, 'राज्यकर्ते बोगस दौरे बंद करा आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत करा,' अशा घोषणा आंदोलकांनी सरकारच्या विरोधात दिल्या. संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिण तालुका अध्यक्ष दत्ता येवले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.