नांदेड-भोकर नगरपरिषदेचा घनकचरा उचलणाऱ्या ठेकेदाराकडे दीड लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता केशव मुद्देवाडला शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयात मुद्देवाडला हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
४ जून रोजी दुपारी घनकचरा उचलणारा ठेकेदार यशवंत ग्यानोबा प्रधान (रा.आष्टी ता. हदगाव) हे भोकर नगर परिषद मधून कामकाज करुन बाहेर येत होता. यावेळी नगर परिषद गेटसमोर माजी नगरसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ता केशव मुद्देवाड याने प्रधानला थांबवले. तू मागील दीड वर्षापासून ठेकेदारी करतोस. आजपर्यंत एकही रुपया दिला नाहीस. मागील कामाचे दीड लाख रुपये दे, अशी मागणी मुद्देवाड याने केली. दोन दिवसात पैसै नाही दिले तर पुढील टेंडर मिळू देणार नाही, अशी धमकीही प्रधानला दिली.
मुद्देवाड याने खंडणीची मागणी करत जातीवाचक शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे प्रधान यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. प्रधान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी केशव रामा मुद्देवाड विरूध्द अॅट्रासिटी व खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानंतर शुक्रवारी रात्री मुद्देवाड याला पोलिसांनी अटक करण्यात आली.
शनिवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयाने मुद्देवाडला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपअधीक्षक बी. मुदीराज हे तपास करीत आहेत.