नांदेड - खासदार प्रीतम मुंडे यांच्या टीकेला मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ओबीसींच्या आरक्षण प्रश्नासाठी मंत्रीपदाला लाथ मारण्याचा दम महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील एकातरी मंत्र्यांत आहे का? असा प्रश्न खासदार प्रीतम मुंडे यांनी उपस्थित केला होता. त्यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले आहे.
'हा प्रश्न रस्त्यावर उतरुन मांडण्यापेक्षा संसदेत मांडा'
आपण गोपीनाथ मुंडे यांचा वारसा चालवता. त्यांनी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना ओबीसी आरक्षणप्रश्नी संसदेत एक भाषण केले होते. त्यावेळी मुंडे साहेब विरोधी पक्षात होते. मात्र, तुम्ही तर सत्ता पक्षात आहात. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न रस्त्यावर उतरुन मांडण्यापेक्षा संसदेत मांडून सोडवावा, असा सल्ला धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना दिला आहे. भाजपाने ओबीसी आरक्षणावर काढलेल्या चक्काजाम आंदोलनावर धनंजय मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
'भाजपाच्या आरक्षण भूमिकेवर शंका'
मंत्री धनंजय मुंडे नांदेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना भाजपच्या चक्काजाम आंदोलनाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावेली मुंडे यांनी भाजपाच्या आरक्षण भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे. तसेच, खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्राकडून आरक्षण टिकवण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय. प्रीतम मुंडे यांनी संसदेत या आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित केले आणि ते सोडवले तर तो खरा गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा आपण चालवत आहात असे म्हता येईल असेही मुंडे म्हणाले आहेत.