नांदेड - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ब्रिटिशांनाही लाजवेल अशा पद्धतीने राज्य सरकारचा कारभार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडीत करत आहे. सुरुवातीला लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र आता सक्तीने वीज बिलाची वसुली सुरू आहे. हे थांबले नाही तर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा दरेकर यांनी दिला आहे. ते नांदेडमध्ये खा. प्रतापराव चिखलीकर यांच्या निवास्थानी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, वाढीव वीज बिलाबाबत आम्ही आंदोलन केले, मी संपूर्ण राज्याचा दौरा करत आहे. सगळीकडे शेतकऱ्यांची वीज बिलाच्या बाबतीत तक्रार आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर आता मराठवाड्याचा दौरा करत आहे. अगोदर शेतकऱ्यांना नोटीस द्या, वाढीव वीजबिल दिले असेल तर कमी करा, सरसकट डीपी बंद करू नका. शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवा नाहीतर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.
राजीनामा नाट्य नको?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले की, राजीनामा सभापती व राज्यपाल यांच्याकडे द्यायला हवा. पक्षप्रमुख व मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिल्याचे नाटक करू नये, या राजीनाम्याला काहीही अर्थ नाही. ज्यावेळी निर्दोषत्व सिद्ध होईल तेंव्हा पुन्हा मंत्रिपद द्या आमची काहीही हरकत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
'आंदोलनजीवी' म्हणजे नेमके काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आंदोलनजीवी' या शब्दाचा गैरसमज करू नये. त्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या आंदोलनात इतर काही लोक राजकारण करू पाहत आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या आडून राजकारण करणाऱ्या लोकांसाठी आंदोलनजीवी शब्द असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. या पत्रकार परिषदेला खा. प्रतापराव चिखलीकर, आ.राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रविण साले यांची उपस्थिती होती.