नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत उन्हाळी-२०२१ सर्व पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने दिनांक 13 जुलैपासून सुरुवात करण्यात आल्या होत्या. परंतू परीक्षा सुरूवात केल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा देताना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. या अडचणींमुळे त्यांचे शैक्षणिक नुकसाना टाळण्यासाठी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे यांनी दिली.
परीक्षा व मूल्यमापन मंडळाची तातडीची बैठक
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत उन्हाळी-२०२१ सर्व पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने अनुक्रमे पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. १३ जुलै, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा २० जुलै, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा २६ जुलै पासून प्रस्तावित होत्या. या परीक्षेची पूर्ण तयारी परीक्षा विभागाने अतिशय चोखपणे पार पडलेली होती. उन्हाळी-२०२१ ह्या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी बाह्य एजन्सी नेमण्यात आलेली होती. त्या एजन्सीमार्फत दि. १३ जुलैला ऑनलाईन परीक्षेची सुरुवात झाली. या ऑनलाईन परीक्षेदरम्यान एजन्सीमार्फत विद्यार्थ्यांना परीक्षा देतांना अनेक तांत्रिक अडचणी आल्यामुळे दि. १३ जुलैला विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या तातडीच्या बैठकीतील ठरावानुसार नियोजित १३ जुलै पासून सुरू झालेल्या उन्हाळी-२०२१ पदवी अभ्यासक्रम अंतिम वर्षाच्या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.
सुधारित वेळापत्रक लवकरच
विद्यापीठाच्या दि. १३ जुलैली नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात आलेल्या ज्या परीक्षा ह्या सुधारित वेळापत्रकानुसार पुन्हा घेण्यात येणार आहेत. विद्यापीठांतर्गत होणाऱ्या पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या दि.१३ जुलै, २० जुलै, व दि.२६ जुलै पासून सुरब होणाऱ्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ह्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल. महाविद्यालयीन स्तरावर क्लस्टर पद्धतीने घेण्यात येणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उन्हाळी-२०२१ या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षेमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याबाबतची सर्व विद्यार्थ्यांनी, परीक्षा केंद्र प्रमुखांनी, शिक्षकांनी, शिक्षेकेत्तर कर्मचारी यांनी नोंद घेऊन सबंधित विद्यार्थ्यांच्या निर्देशनास आणून द्यावे, असे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांनी कळविले आहे.