नांदेड - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेच्या एका मंत्र्याच नाव येत आहे. या संदर्भात शिवसेनेचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. त्या प्रकरणाची माहिती पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागवली आहे. त्यामुळे आपण या विषयी बोलणं योग्य नसल्याचे उदय सामंत म्हणाले. ते नांदेड मध्ये बोलत होते. संबंधित मंत्री माझे सहकारी आहेत आणि त्या आत्महत्या प्रकरणाचा पोलिसाकडून तपास सुरू आहे. तपासात सत्य समोर येईल असे देखील शिवसेनेचे मंत्री उदय सामंत म्हणाले. ते नांदेड येथे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
राज्यपालांचा मी लाडका मंत्री - उदय सामंत
राज्यपाल यांच्या विमान प्रकरणासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी उपहासात्मक उत्तर दिले ते म्हणाले की, मी राज्यपाल यांचा लाडका मंत्री आहे. गेल्या वर्षभराचा प्रवास पहिला तर त्यांनी माझे काम कधीच अडवले नाही. ते लोकशाही प्रचंड मानतात. ते लोकशाहीच्या पद्धतीने काम करतात. लवकरच ते राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्त्या करतील. इथपर्यंतच मला माहित आहे. विमानाचे नेमके काय झाले हे मला माहित नाही. असे म्हणत त्यांनी चांगलाच चिमटा काढला.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विद्यापीठाच्या परीक्षा ऑन लाईन आणि ऑफ लाईन पद्धतीने - उदय सामंत
कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा ऑन लाईन आणि ऑफ लाईन या दोन्ही पध्दतीने घ्यावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा ऑन लाईन आणि ऑफ लाईन असे पर्याय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आज नांदेड विद्यापीठात त्यांनी जनता दरबार भरवला होता. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. यापुढे देखील विद्यापीठाच्या परीक्षा दोन्ही पध्दतीने घेतल्या जाणार असल्याचे उदय सामंत म्हणाले.