नांदेड- बँक कर्ज देत नसल्याने त्रासून गेलेल्या किनवटच्या माजी नगराध्यक्षांनी बँकेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माजी नगराध्यक्ष अरुण आळणे असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
मांडवीच्या स्टेट बँकेत किनवटचे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांनी पंख्याला दोरी लटकून फाशी घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बँकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
पीक कर्जाची केली होती मागणी-
किनवटचे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे व त्यांची पत्नी करुणा आळणे यांच्या मालकीची कनकी शिवारात शेती आहे. या शेतीवर पीक कर्जासाठी मांडवीच्या स्टेट बँकेकडे पीक कर्जाची त्यांनी फाईल दाखल केली होती. अनेक महिने होऊनही मांडवीच्या बँकेने पीक कर्ज दिले नाही. या कर्जासाठी त्यांनी अनेकवेळा बँकेच्या पायऱ्या झिजवूनही त्यांचा फायदा झाला नाही. आळणे हे सोमवारी दुपारी बँकेतच दोर घेऊन आले. त्यांनी फिल्ड ऑफिसरच्या टेबलवर चढून पंख्याला दोर बांधून फाशी घेण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा-रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज देण्याचे बँकांना आदेश
पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार टळला-
पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे, विजय कोळी व बँकेचे सुरक्षा रक्षकांनी प्रसंग सावधानता बाळगत त्यांना खाली उतरविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. बँकेतच आत्महत्येच्या प्रयत्न करण्याच्या घटनेमुळे बँकेत उपस्थित शेतकरी व बॅंक कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता.
हेही वाचा-आधी पीक कर्जाचे व्याज भरा, नंतर शासन देणार थेट भरपाई
इंटरनेट चालत नसल्याचे दिले जाते कारण-
स्टेट बँकेला बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी असून ती सतत बंद असते. त्यामुळे बँकेचा काम करण्यासाठी विलंब होत आहे. या शाखेकडे दोनशे शेतकऱ्याचे पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. ही सर्व प्रकरणे येत्या पंधरा दिवसात पूर्ण करू, असे आश्वासन बँक प्रशासनाकडून देण्यात आले आहे. एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही बँक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, अनेकदा सार्वजनिक बँकांकडून पीक कर्ज देताना दिरंगाई तसेच टाळाटाळ करण्यात आल्याचे प्रकार राज्यभरात समोर आले आहेत.