नांदेड - दिल्ली विमानतळावर शुक्रवारी संशयित बॅग सापडली होती. त्यात आरडीएक्स असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर देशातील अतिसंवेदनशील भागात दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यासह नांदेड शहराचा दशहतवादी संघटनेशी असलेला सलोखा लक्षात घेऊन केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून नांदेड शहरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, नांदेड शहरात सुरक्षा वाढविण्यात आली असून विविध सुरक्षा पथकांची येथील महत्त्वाच्या ठिकाणी करडी नजर राहणार आहे. दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-३ वर एका संशयिताने आरडीएक्सची बॅग ठेवली होती. या घटनेनंतर शहरातील विमानतळ व इतर ठिकाणच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून याबाबत यापूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तसेच केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून निवडणुकीनंतर अलर्ट राहण्याबाबत सांगण्यात आले होते. यानंतर आज दिल्लीतील विमानतळ येथे आरडीएक्सने भरलेली बॅग सापडली असून या बॅगेबाबतचा तपास एन.आय.ए आणि इतर यंत्रणांकडून सुरू झाला आहे.
हेही वाचा - चर्चेसाठी आमची दारे खुलीच, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चर्चा होत नाही : मुनगंटीवार
मराठवाड्यात दहशतवादी संघटनांचे असलेले संबंध पाहता दिल्लीतील घटनेनंतर पोलीस यंत्रणेसह इतर यंत्रणाही अलर्ट झाल्या आहेत. याबाबत शहरातील अनेक ठिकाणी नाकाबंदी, सुरक्षेसाठी टेहळणी करण्यात येत आहे. यापूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. अनेक ठिकाणांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दिल्लीतील सुरक्षा संस्थांकडून महाराष्ट्रातील निवडणूक झाल्यावर अप्रिय घटना घडू शकतात, यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे, असा इशारा यापूर्वीच दिला होता.