नांदेड - कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी देशात टाळेबंदी व संचारबंदी सुरु आहे. या आजारावर मात करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी पोलीस प्रशासन गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर उतरुन बंदोबस्त करत आहे. बुधवारी इतवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी पथसंचलन केले. यावेळी नागरिकांनी पोलीसांवर गुलाब व फुलांची उधळण करुन स्वागत केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या पंधरा दिवसापासून लॉकडाऊन व संचारबंदी सुरु आहे. पोलीस नागरिकांना घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन करत आहे. इतवारा पोलीस स्टेशन समोर 3 दिवसांपूर्वी रात्रीला मोठा जमाव जमला होता. इंडोनेशिया येथुन आलेल्या धर्मप्रचारकांविरुद्ध पोलीसांनी गुन्हे दाखल करु नये, यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. दबावाला बळी न पडता पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
जुने नांदेड शहर अतिसंवेदनशील म्हणून राज्यात परिचित आहे. बुधवारी इतवारा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस उप अधीक्षक धनंजय पाटील व पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी पोलीसांचे पथसंचलन केले.
यावेळी त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव केला. तसेच इतवारा हद्दीत राज्य राखीव पोलीस दलांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे.