नांदेड - शहरात एका गर्भवती महिलेला पोलिसांनी स्वतःचे वाहन देऊन रुग्णालयात पोहोचवण्यास मदत केली आहे. गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास शहरातील गुरुद्वारा चौक परिसरात एका गर्भवती महिलेला प्रसूतीच्या कळा येत होत्या. ही बाब भाजपा नगरसेविका गुरूप्रीतकौर सोडी यांच्या लक्षात आली. सोडी यांनी गुरुद्वारा चौक परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना याबद्दल माहिती देत मदतीची मागणी केली.
गस्तीवर असलेल्या वजीराबाद पोलीस ठाण्यातचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांना वायरलेसवर माहिती देताच शिवले यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आपली पोलीस जीप गर्भवती महिलेला उपलब्ध करून दिली. त्या वाहनातून गर्भवती महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वजीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले आणि नगरसेविका गुरूप्रीतकौर सोडी यांनी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.