नांदेड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. नांदेड जिल्हा सीमावर्ती जिल्हा असल्यामुळे तेलंगणा तसेच कर्नाटक राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेजारील राज्यात ये-जा करणे कोणालाही शक्य नाही. परंतु कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलिसांनीच कायद्याला हरताळ फासल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनच्या काळात स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तेलंगणा राज्यात जाऊन आपल्या कुटुंबीयांना नांदेड येथे आणल्याच्या प्रकार समोर आला आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सदर पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित केले आहे.
हेड काँस्टेबल सलीम बेग हे कोणत्याही प्रकारची रजा अथवा वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता १० एप्रिलला रजेवर गेले. महाराष्ट्र तसेच तेलंगणा या दोन्ही राज्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे असे असताना सलीम बेग यांनी तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे जाऊन आपली पत्नी व मुले अशा कुटुंबातील एकूण ५ व्यक्तींना सोबत घेऊन नांदेड येथे आले. तेलंगणातून परतल्यानंतर सदर कर्मचाऱ्याने कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी केली नाही,असेही निदर्शनास आहे. विशेष म्हणजे सदरचा पोलीस कर्मचारी गणवेशात गेल्याचे सांगण्यात येते.
सध्या देशभर लॉकडाऊन सुरू आहे तसेच जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस, आरोग्य तसेच महसूल व अन्य विभागातील कर्मचारी तसेच वरीष्ठ अधिकारी कोरोना विरुद्धच्या लढ्यात अहोरात्र परिश्रम घेत आहेत. परंतु दुसरीकडे काही कर्मचारी अशा पद्धतीने आपल्या वर्दीचा गैरफायदा घेऊन नियमबाह्यरित्या वर्तन करत असल्यामुळे पोलीस विभागाविषयी चुकीचा संदेश जात आहे. परिणामी पोलीस दलाची प्रतिमा मलीन होण्यास हे कर्मचारी कारणीभूत ठरत आहेत. सदर कर्मचाऱ्याने केलेले वर्तन गंभीर तसेच गैरस्थितीचा भाग असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी सलीम बेग यास निलंबित करण्याचे आदेश काढले आहेत.
कोणत्याही अधिकाऱ्याने अथवा कर्मचाऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळात पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, तसेच पुढील आदेशापर्यंत कर्तव्यावर हजर रहावे, असे आदेश असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याने अशा पद्धतीने केलेले वर्तन त्याच्याच अंगलट आले आहे.