नांदेड- रेल्वे प्रवासादरम्यान एक्स्प्रेसच्या वातानुकुलित डब्यातून एका महिला प्रवाशाची दागिन्याची पर्स चोरट्याने पळवून नेली होती. या प्रकरणातील चोरटा सराफी व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या हाती लागला आहे. चोरट्याकडून हिरे, सोने असा १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा- शेतकऱ्यांच्या हातावर तुरी.. हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी
मूळचे नांदेडचे परंतु, सध्या जालन्यात वास्तव्यास असलेले संजीवकुमार काबरा हे पत्नीसह १९ जानेवारी रोजी रात्री काचीगुडाहून चेन्नई एक्सप्रेस ने वातानुकुलित डब्यातून जालन्याकडे निघाले होते. २० जानेवारी रोजी सकाळी ६ ते ६.३० दरम्यान पूर्णाजवळ येत असतानाच दोन चोरट्यांनी त्यांच्याकडील दागिन्यांची पर्स लांबवली. त्यानंतर पूर्णा रेल्वे स्थानकावरून पलायन केले.
या पर्समध्ये रोख २५ हजार रुपये, मोबाईल, हिरे व सोन्याचे दागिने असा १५ लाखांहून अधिक किमतीचा ऐवज होता. या प्रकरणी काबरा यांच्या फिर्यादीवरून नांदेड रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील एक चोरटा नांदेड मधील एका सराफी व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी गेला असता त्यांना संशय आला. त्यांनी ही माहिती नांदेड पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस पथकाने आरोपी शेख इलियास शेख इसाक (२८) यास पकडले. तो मूळचा मस्तानपुरा शाहूबाई गल्ली पूर्णा येथील असून सध्या तो नांदेडच्या मिल्लतनगरमध्ये राहतो, अशी माहिती पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक राठोड उपस्थित होते. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डी. जी. चिखलीकर सहायक पोलीस निरीक्षक सुनील नाईक, मांजरमकर, उपनिरीक्षक प्रवीण राठोड, यांच्या पथकाने केली.