नांदेड - केरळ राज्यातील राहुल गांधी यांच्या वायनाड मतदार संघ, तसेच लगतच्या जिल्ह्यातील काही शिक्षक, कर्मचारी व मोबाईल टेक्निशियन विद्यार्थी हे लॉकडाऊनमुळे नांदेड जिल्ह्यात अडकून पडले होते. त्यांना युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे यांनी सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून केरळला पाठविले.
देशभरात कामगार, मजूर, विद्यार्थी, कर्मचारी, पर्यटक हे लोकडाऊनमुळे जिकडे तिकडे अडकून पडले आहेत. याची माहिती राहूल गांधी यांच्या कार्यालयातून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना कळवल्यानंतर ही सूचना तांबेनी विठ्ठल पावडे व बुलढाण्याचे मनोज कायंदे यांना केली. याची दखल घेत 25 तरुणांची युवक काँग्रेसच्या वतीने सर्वांचे आधार कार्ड, फिटनेस प्रमाणपत्र, वाहनांची कागदपत्रं व सर्व लागणारी माहिती जिल्हा कार्यालयात दिली होती. जिल्हाधिकाऱ्यास विनंती अर्ज करून पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या कार्यालयाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे नांदेड येथून जाण्यासाठी तात्काळ परवानगी मिळाली.
त्याच बरोबर केरळ सरकारकडून ना हरकत पत्रासाठी प्रयत्न करण्यात आला. युवक काँग्रेसने केलेल्या पाठपुराव्याने बऱ्याच दिवसापासून प्रयत्नात असलेल्या व परेशान असलेल्या केरळच्या तरुणांच्या चेहऱ्यावर थोडासा दिलासा मिळाल्याचं समाधान दिसून आलं. परवानगी मिळाल्यानंतर ही सर्वांना खाजगी ट्रॅव्हल्सने केरळकडे पाठविण्यात आले. याप्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, उपाध्यक्ष तथा नगरसेवक संदीप सोनकांबळे व उपाध्यक्ष रहीम खान हे उपस्थित होते.