नांदेड - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लावलेल्या कडक लॉकडाऊनचा पहिल्याच दिवशी नांदेड शहरात पुरता फज्जा उडाला आहे. रस्त्यावर बॅरिकेड्स लावले असले तरीही मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर आले आहेत. वाहनांची वर्दळ सुरुच आहे. लॉकडाऊन काळात नागरिकांना जाब विचारणाऱ्या यंत्रणांनी नांग्या टाकल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे नियम जरी कडक असले तरी त्याची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे कडक लॉकडाऊनचा फारसा परिणाम झालेला नाही.
लोक रस्त्यावर बिनधास्त
राज्य शासनाने कड़क लॉकडाऊन लागू करतांना अत्यावश्यक सेवेमध्ये वैद्यकीय सेवेला अधिक महत्त्व दिले आहे. नांदेड शहरामध्ये वाहतुकीची मोठी गर्दी वाढली असून विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या देखील अधिक आहे. अनेक ठिकाणी शहरात पोलिसांचे फिक्स पाॉइंट असले तरीही पोलीस यंत्रणा रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांची चौकशी करत नाही. त्यामुळे लोक बिनधास्तपणे रस्त्यावरुन फिरताना दिसून येत आहेत.
विनाकारण फिरणाऱ्यावर दहा हजाराचा दंड
राज्यात गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, त्याचा परिणाम नांदेडात दिसून येत नसल्याचं चित्र समोर येत आहे. आज (शुक्रवार) सकाळपासून शहरातील आत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रतिष्ठाने बंद असली तरी रस्त्यावर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. जर नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरणे बंद नाही केले तर अशा नागरिकांवर 10 हजार रुपये दंडची कारवाई करणार असल्याचे नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सांगितले आहे.