नांदेड- केंद्र शासनाने देशभरात येत्या १२ सप्टेंबरपासून ४० विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नांदेड विभागातील परभणी- हैदराबाद आणि हैदराबाद-परभणी या दोन विशेष रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. या विशेष गाड्या दररोज धावणार असून तिकिटाचे आरक्षण केल्याशिवाय प्रवास करता येणार नाही, असे रेल्वे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
हेही वाचा-नांदेडमध्ये रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात वाढ प्रस्तावित; कृषी विभागाची माहिती
लॉकडाऊन झाल्यानंतर तब्बल ५ महिन्यांनी नांदेड ते मुदखेड मार्गावर प्रवासी रेल्वे धावणार आहे. या रेल्वेमुळे परभणी व नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांना थेट हैदराबादला जाणे शक्य होणार आहे.दक्षिण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत सुरू होणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांमधील रेल्वे गाडी क्र. ०७५६३ हैदराबाद - परभणी विशेष एक्सप्रेस नियमित रेल्वे दररोज रात्री २२.४५ वाजता हैदराबाद येथून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता परभणीला पोहचणार आहे. रेल्वे गाडी क्र. ०७५६४ परभणी - हैदराबाद नियमित विशेष एक्सप्रेस रेल्वे परभणी स्थानकावरून दररोज रात्री २२.३० वाजता निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता हैदराबाद येथे पोहचणार आहे.
विशेष रेल्वे गाड्या परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, बासर, निजामाबाद, सिकंदराबाद व हैदराबाद या स्थानकावर थांबणार आहे. प्रवाशांनी कोविड विषयक केंद्र आणि राज्य शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून एकमेकांपासून सुरक्षित अंतरावर बसूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे. प्रवाशांना आगाऊ आरक्षण केल्याशिवाय रेल्वेत चढता येणार नाही, असे नांदेड विभागाचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे यांनी कळविले आहे.