नांदेड - जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. ही बाब लक्षात घेता शहरी भागासह ग्रामीण भागातही वैद्यकीय सुविधा पोहचाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ऑक्सिजनचा उपलब्ध साठा पाहता जिल्ह्यातील किनवट आणि देगलूरच्या धर्तीवर इतर तालुक्यांच्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेत उपचार न मिळाल्यास त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते. यामध्ये एखाद्या रुग्णाला लवकर उपचाराची गरज असेल तर त्याची पुर्तता वेळेत होत नाही. यामुळे रूग्णाच्या जिवाला धोका होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांना तालुक्याच्या पातळीवरच ऑक्सिजनसह इतर उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी येत्या सोमवारी मालेगाव येथे व त्यानंतर अर्धापूर येथे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येत असल्याचीही माहिती दिली.
मालेगाव येथे येत्या सोमवारपासून कोविड केअर सेंटरचा प्रारंभ!
मालेगावसह भोकर येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. या ठिकाणी प्रत्येकी 30 बेडची सुविधा केलेली आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या मालेगाव येथील कोविड केअर सेंटरमधील 30 खाटांना ऑक्सिजनची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे.
सध्या ३९ टन ऑक्सिजन उपलब्ध!
ज्यांची प्रकृती अधिक खालावली आहे. अशा रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण पाहून याबाबतची काळजी घेण्याचे निर्देश चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. आजच्या घडीला जिल्ह्यातील एकूण मागणी २९ ते ३० टन ऑक्सिजनची आहे. आपल्याकडे सध्या ३९ टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. रोज मागणीप्रमाणे ऑक्सिजन पोहचत असून सध्यातरी धास्तीचे कारण नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे १० केएलचे दोन मोठे टँक कार्यरत असून या ठिकाणी आणखी २० केएलचा मोठा टँक उभारला जात आहे. जिल्हा रूग्णालय येथे १३ केएल क्षमतेचा मोठा टँक आहे. सत्यकमल गॅसेस यांचा २० केएलचा मोठा टँक, कलावती एअर प्रोडक्टचा २० केएल क्षमतेचा एक टँक असे एकूण ९३ केएल स्टोरेजची क्षमता आहे. या व्यतिरिक्त एअर सेप्रेशनचा तीन टन, गुरू गॅस पाच टन, अनुसुया (कृष्णूर) चा पाच टन अशी 1१३ टन रोज उत्पादन क्षमता असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहीत राठोड यांनी दिली.
बैठकीस उपस्थित अधिकारी
या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दिपक म्हैसकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त रोहित राठोड आदी उपस्थित होते.