नांदेड- नायगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला अनेकांनी सोडचिठ्ठी दिली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे भाजपला बळ मिळाले आहे. भाजपची स्थिती मजबुत झाल्याने इच्छुकांची संख्याही वाढली आहे. तर दुसरीकडे वंचितचे ग्रहण नेमके कोणावर शेकणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
नायगाव विधानसभा मतदारसंघात २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरूध्द अपक्ष अशी लढत झाली होती. या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष म्हणून लढलेले वसंतराव चव्हाण विजयी झाले होते. राष्ट्रवादीच्या बापूसाहेब गोरठेकरांचा त्यांनी ११ हजार मतांनी पराभव केला होता. जवळपास तितक्याच फरकाने २०१४ साली झालेल्या निवडणुकीत वसंतराव यांनी भाजपच्या राजेश पवार यांचा पराभव केला आणि ते दुसऱ्यांदा विजयी झाले. मात्र आता या मतदारसंघातील चित्र बदलले आहे. स्व:त राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले बापूसाहेब गोरठेकर यांनी पक्ष सोडला आहे. गोरठेकर आता भाजपवासी झाल्याने नायगाव विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा भाजपला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आता येथून भाजप इच्छुकांची संख्या वाढली आहे.
वसंतराव चव्हाण यांनी दहा वर्षांच्या काळात मतदारसंघातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. नायगाव मधल्या ग्रामपंचायंतीच्या जागेचा वाद सोडला तर चव्हाण यांच्यावर गेल्या दहा वर्षात भ्रष्टाचाराचे कोणतेही गंभीर आरोप झालेले नाहीत. वसंतराव पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. लोकसभा निवणुकीत भाजपला जवळपास २० हजारांचे मताधिक्य मिळाले होते. त्याचा फटका मात्र त्यांना बसू शकतो.
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपला २० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे भाजपच्या गोटात नवचैतन्य पसरलेले आहे. इथून भाजपकडून राजेश पवार, बालाजी बच्चेवार, श्रावण भिलवंडे, डॉ.मिनल खतगावकर, माणिक लोहगावे आदी उत्सुक आहेत. गेल्या पाच वर्षांपासून भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजेश पवार हे मतदारांच्या संपर्कात आहेत. तसेच त्यांच्या पत्नी पुनम पवार या मांजरम जिल्हा परिषदेच्या गटातून सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत. त्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे भास्करराव पाटील खतगांवकर आपल्या स्नुशा डॉ.मीनल खतगावकर यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत.
गोरठेकरांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी जि.प.सदस्य मारोतराव कवळे गुरुजी हे वंचित आघाडीकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. नायगाव विधानसभा मतदारसंघ हा उमरी, धर्माबाद आणि नायगाव अशा 3 तालुक्यात विखुरलेला आहे. मराठा, मातंग, लिंगायत आणि धनगर समाजाची मते इथे निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे काँग्रेस-भाजपच्या मतविभाजनात वंचित आघाडीला फायदा होऊ शकतो, अशी शक्यता गृहीत धरुन वंचित आघाडीही इथे मैदानात आहेत. मारोतराव कवळेंसह उत्तम गवाले, आनंद रोहरे, भास्कर भिलवंडे, शिवाजी कागदे हे वंचितकडून इच्छुक आहेत.
शिवसेनेकडून गंगाधर बडूरे, रवींद्र भिलवंडे आणि माधवराव कल्याण हे मैदानात उतरण्यास तयार आहेत. बापुसाहेब गोरठेकर यांनी पक्ष सोडल्यामूळे या मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तीत्व राहिले नाही. या स्थितीत वसंतराव चव्हाण तिसऱ्यांदा निवडून येतात का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
नायगाव मतदारसंघातील समस्या...
मतदारसंघात रेती माफींयांनी थैमान घातले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नदी काठच्या गावांच्या रस्त्यांची चाळणी झाली आहे. मिळणाऱ्या राजकीय पाठबळामुळे हा मतदारसंघ म्हणजे या माफीयांचा अड्डा बनला आहे. या मतदारसंघात सिंचनाचा प्रश्न अद्याप कायम आहे. त्यामुळे “गंगाथडीला” सुकाळ आणि अन्यत्र कायम दुष्काळ, अशी स्थिती या मतदारसंघात आहे. कृष्णुर येथील पंचतारांकीत औद्योगीक वसाहतीत फारसे उद्योग अद्याप आलेच नाहीत. त्यामुळे इतक्या वर्षानंतरही या तालुक्याची बेरोजगारीची समस्या कायमच आहे. या मतदारसंघातील अनेक बेकार पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षानुवर्ष हैदराबादला जात असतात.