नांदेड - मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असताना नांदेड जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण आढळून आला नसल्याने नांदेड जिल्हा सुरक्षित आहे. मात्र नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद तालुक्याच्या शेजारील तेंलगाणा राज्याच्या तानुर या गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने धर्माबाद तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे.
धर्माबादपासून अगदी २० कि. मी. अंतरावर तानुर हे तेलंगाणा राज्यातील गाव आहे. शनिवारी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला असून त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या संपर्कातील १३ लोकांना तेंलगाणा प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांना निर्मल येथील शासकीय रुग्णालयात आयसोलेट केले आहे.
धर्माबादपासून जवळ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आता धर्माबाद महसूल व पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. तेंलगाणा व महाराष्ट्र मार्गावरील सर्व मुख्य मार्ग लॉकडाऊनच्या काळापासून सील करण्यात आले असून तेथे पोलिसांचा खडा पाहारा ठेवण्यात आला आहे. मात्र आता खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच छोटे मोठे मार्ग गावकऱ्यांच्या मदतीने बंद करण्यात आले आहेत. तानुर या गावापासून जवळ असलेल्या महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या बन्नळी, येताळा, येळवत, या गावातील लोकांची तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी सुरू केली आहे. धर्माबाद पासून जवळच्या गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आता मात्र धर्माबादकरांच्या चिंतेत भर पडली आहे.