नांदेड: रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक, परशुराम याग, महानैवेद्य चढवून सकाळी १० वाजती महाआरती करण्यात आली. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर श्री रेणुका माता मंदिरात आंब्याची आरास करण्यात आली होती. यावेळी हजारो भाविकांनी उपस्थिती लावत श्री रेणुका माता आणि श्री परशुरामाचे दर्शन घेतले.
माहूर गडावर रोप-वे होणार: नांदेडच्या माहूर गडावर अत्याधुनिक रोप-वे लवकरच बसवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नितीन गडकरी आणि खासदार हेमंत पाटील यांनी नुकतीच ऑस्ट्रिया या देशाला भेट दिली. माहूर गडावर भौगोलिक परिस्थितीनुसार तांत्रिकदृष्ट्या तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण रोप-वे असावा यासाठी ऑस्ट्रिया येथे पार पडलेल्या रोप-वे एअरबस प्रदर्शनाला नितीन गडकरी आणि हेमंत पाटील यांनी भेट दिली. लवकरच माहूर गडावर अत्याधुनिक रोप-वे भाविकांसाठी तयार होणार असल्याची माहिती गडकरींनी दिली.
देवीचे दर्शन होणार सुकर: साडेतीन शक्तीपीठांपैकी मुख्य मूळ पीठ असलेल्या श्री रेणुका माता मंदिर माहूर येथे महाराष्ट्रातून तसेच जगभरातून भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, वयोवृद्धांना मंदिराच्या पायऱ्या चढून जाण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. अनेक भाविक डोली, झुला, कावड करून वर जातात. यामुळे भाविकांवर आर्थिक भार पडतो. रोप-वे झाल्यानंतर रेणुका देवीचे दर्शन घेणे सोपे होईल. भाविकांनीही लवकरात लवकर रोप-वे बसवण्याची मागणी केली आहे.
विदेशी पाहुण्यांची माहूर गडावर हजेरी: माहूर गडावर 29 मार्च, 2023 रोजी विदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली. विदेशी पाहुण्यांनी श्री रेणुका देवी मातेचे दर्शन घेतले. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ग्रीस, मलेशिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, पोलंड या देशातून जवळपास चाळीस विदेशी पाहुणे आले होते. त्यांनी मातेच्या दरबारात जोगवा,गोंधळ घातला. ते पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले होते. दरम्यान विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कांनव, व्यवस्थापक योगेश साबळे यांनी पाहुणे विदेशी पाहुण्यांचे स्वागत केले होते. विदेशी पाहुणे दर्शनासाठी आल्याने माहूर परिसरातील नागरिकांनी पाहुण्यांना पाहण्यासाठी प्रचंड अशी गर्दी केली होती.
विदेशी पाहुण्यांनी जाणले माहूरचे महात्म्य: गडावरील नयनरम्य दृश्य पाहून विदेशी पाहुण्यांनी आनंद उत्सव सादरा केला. नवरात्राचे महत्व विदेशी पाहुण्यांना सांगण्यात आले. नागपूर येथील गाईडने या भागाची माहिती त्यांना त्यांच्या भाषेत ट्रान्सलेट करून दिली. माहूर गडाला एक महान तीर्थक्षेत्र व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख शक्तीपीठ मानले जाते. माहूर या शहराला चहूबाजूंनी डोंगरांनी आणि घनदाट जंगलांनी वेढलेले आहे.