नांदेड - जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची निवडणूक सरपंच पदाच्या आरक्षणाविना झाली. मतदान आणि मतमोजणीच्या प्रक्रियेनंतर गावात आता सरपंच पदाचे आरक्षण नेमके कुणाला? याची चर्चा चांगलीच रंगली आहे. आरक्षण सोडतीकडे उमेदवारासह गावकऱ्यांचेही लक्ष्य लागले आहे.
जिल्ह्यात 1 हजार 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका -
जिल्ह्यात एकूण एक हजार 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. १०६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ९०७ ग्रामपंचायतींसाठी मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. आता आगामी पाच वर्षासाठीचे सदस्य मतदारांनी निवडून दिले आहेत विविध पक्षांची नेतेमंडळी ग्रामपंचायत आमच्याच ताब्यात असल्याचा दावा करत असली तरी सरपंच कुणाचा होणार ? त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे . सोडत झाल्यानंतर त्यानुसार पुढील व्युहरचना आखण्याचे पॅनलप्रमुखांचे नियोजन आहे.
किरकोळ प्रकार वगळता निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात -
आता सदस्यांसह सर्वांचेच सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुक होण्याआधी प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी सरपंच पदासाठी लिलाव झाल्याच्या घटना समोर आल्या तसेच काही ठिकाणी तक्रारीही झाल्या त्यामुळे राज्य सरकारने सरपंचपदाचे आरक्षण रद्द करून निवडणुका पार पडल्यानंतर नव्याने सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याचा चांगला परिणाम ग्रामपंचायत निवडणुकांवर झाला . काही ठिकाणचे किरकोळ अपवाद वगळता खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका पार पडल्या.
ओट्यावर... चावडीवर... पारावर आरक्षणाची चर्चा -
गावागावात 3 पॅनेलप्रमुखांनी आपआपले पॅनल तयार करून चांगली लढत दिली. दि.१८ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आणि विविध पक्षांच्या नेतेमंडळींनी दावे - प्रतिदावे करत आमच्याच पॅनलचे वर्चस्व मिळवल्याचा दावा करण्यास सुरूवात केली. काही ठिकाणी काट्याची लढत झाली. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षविरहित असल्यामुळे कोण कोणाच्या बाजूने आणि कोण कोणत्या पक्षात हा विषय गौण असतो . मात्र , आता सरपंचपदाची निवडणुक होणार आहे . त्यामुळे आता सर्वांनाच सरपंचपदाचे आरक्षण कुठल्या प्रवर्गाला सुटणार ? याची चिंता लागली आहे. गावच्या ओट्यावर, पारावर व चावडीवर नेमका सरपंच कोण याचीच खमंग चर्चा रंगली आहे.