नांदेड- जिल्ह्यात रविवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात एकही स्वॅब पॉझिटिव्ह न आल्याने नांदेड जिल्हावासियांनी मोठा दिलासा मिळाला आहे. पंजाब भवन यात्री निवास नांदेड येथील 6 बाधित व्यक्ती व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नांदेड येथील 2 बाधित तसेच कोविड केअर सेंटर माहूर येथील 1 असे 9 बाधित व्यक्ती बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 177 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत.
रविवारी प्राप्त झालेल्या 98 अहवालापैकी 94 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. चार अहवालांचा निष्कर्ष अनिर्णीत आहे. सध्या जिल्ह्यातील 66 कोरोनाबाधित व्यक्तींवर उपचार सुरु आहेत. यापैकी 3 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. यामध्ये 52 वर्षाची एक महिला आणि 52 व 54 वर्षाचे दोन पुरुषांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे13 जणांचा मृत्यू झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील 66 कोरोनाबाधित व्यक्तींपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी,नांदेड येथे 17 जण उपचार घेत आहेत. पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 42 तर मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 2 जणांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील 5 कोरोनाबाधित व्यक्ती औरंगाबाद येथे उपचार घेत आहेत. रविवारी 135 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल सोमवारी सायंकाळपर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षिप्त माहिती पुढील प्रमाणे
नांदेड जिल्हा प्रशासनाच्यावतीने 1 लाख 48 हजार 51 नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले आहे, आतापर्यंत 5 हजार 19 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. यापैकी 4 हजार 347 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.रविवारी तपासणीसाठी 135 नमुने पाठवण्यात आले आहेत. तर 191 स्वॅबचे अहवाल अनिर्णीत आहेत. 83 स्वॅबची तपासणी नाकारण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 256 वर पोहोचली असून 177 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 66 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे. जेणे करुन आपल्या सभोवती कोरोनाबाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.